एक जानेवारीपासून ‘गाव तेथे काँग्रेस’
Featured

एक जानेवारीपासून ‘गाव तेथे काँग्रेस’

Sarvmat Digital

नवा संकल्प : जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा काँग्रेस व सर्व फ्रंटल संघटनांतर्फे 2020 हे अहमदनगर जिल्ह्यात संघटना बांधणीचे वर्ष म्हणून काम करणार असून, त्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हा काँग्रेसतर्फे 1 जानेवारी 2020 पासून ‘गाव तेथे काँग्रेस’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. वर्षभरात जिल्ह्यातील प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.

अहमदनगर येथे जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित तालुकाध्यक्षांच्या बैठकीत आ. डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके होते. बैठकीस आ. लहू कानडे, अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष दीप चव्हाण, जि. प. सदस्य प्रताप शेळके, माजी जि. प. सदस्य व समन्वयक ज्ञानदेव वाफारे, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जामखेड तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील,

पारनेर तालुकाध्यक्ष संभाजी राहेकले, पाथर्डी तालुकाध्यक्ष नसीर शेख, राहुरी तालुकाध्यक्ष बाबासाहेब आढाव, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष दीपक भोसले, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, राहाता तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, कोपरगाव तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शेवगाव तालुकाध्यक्ष अमोल फडके, प्रवीण घुले, अ‍ॅड. कैलास शेवाळे, किशोर तपकिर, पोपट खोसे आदी उपस्थित होते.

आ. डॉ. तांबे म्हणाले, काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची परंपरा आहे अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील पिढीतील जिल्ह्यातील अनेकांनी पक्षाचे नेतृत्व केले. भाजप भूलथापा देऊन राजकारण करत आहे. जनतेला त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. भाजप काळातच देशाची अर्थव्यवस्था ढासळली, मात्र त्यावर उपाययोजना करण्याऐवजी धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर राजकारण करत आहे.

जनतेला आता शाश्वत विकास हवा असून तो काँग्रेसचा विचारच करू शकतो. काँग्रेसची कायम ग्रामीण भागाशी नाळ जोडली आहे. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात व जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा सक्षमपणे उभी राहणार असून जिल्ह्यात गाव निहाय शाखा सुरू करण्यात येणार आहेत. तिथे नव्याने कार्यकारणी होणार असून तरुणांना संधी मिळणार आहे.

आ. लहू कानडे म्हणाले, काँग्रेसच हा एकमेव असा पक्ष आहे की जो सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचे काम करतो. असे कोणते क्षेत्र नाही जिथे काँग्रेसनी योगदान दिले नाही. जिल्ह्यात गाव तिथे काँग्रेस ही संकल्पना राबविताना काँग्रेस पक्ष जिल्ह्यात अधिक ताकदीने समोर येईल. यादृष्टीने आपण सर्वानी मिळून काम केले पाहिजे व यासाठी मी देखील सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हण यांची भाषणे झाली.

केंद्र सरकारच्या निषेधाचा ठराव
केंद्र सरकारच्या सीएए, एनआरसीबाबतच्या भूमिकेचा बैठकीत निषेध करतानाच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापनेत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा, तसेच मुख्यमंत्री झाल्याबद्दल ठाकरे, मंत्री झाल्याबद्दल ना. बाळासाहेब थोरात व इतर मंत्री यांच्या अभिनंदनाचा, तसेच शेतकर्‍यांच्या हितासाठी दोन लाखांपर्यंत कर्ज माफीचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. घेतलेलेला धाडसी निर्णय त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com