के. के. रेंज विस्ताराच्या हालचालीने राहुरी तालुक्यातील शेतकरी अस्वस्थ

jalgaon-digital
3 Min Read

23 गावांतील ग्रामस्थ संकटात

राहुरी (प्रतिनिधी) – लष्कराच्या के. के. रेंज या युद्ध सराव क्षेत्रातील नगर, पारनेर, राहुरी तालुक्यांतील 23 गावांतील जमिनी अधिग्रहित विस्तारीकरणासाठी संरक्षण खात्याने हालचाली सुरू केल्याची चर्चा नगरच्या युद्ध सरावादरम्यान झाल्याने 23 गावांतील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

नगर येथे गेल्या सोमवारी के. के. रेंजमध्ये लष्कराच्या रणगाड्यांचा युद्ध सराव झाला. या दरम्यान युद्ध सरावासाठी रेंजमधील जमिन विस्तारासाठी अधिग्रहणाचा विषय चर्चेला आला. संरक्षण खात्याने याबाबतीत हालचाली सुरू केल्याचेही बोलण्यात आले. ही चर्चा राहुरी तालुक्यात समजताच तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासीबहूल गावांतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. के के रेंज मध्ये अधिग्रहित करण्यासाठी नगर, पारनेर, राहुरीतील 23 गावातील 10 हजार 800 हेक्टर शेती कोरडवाहू जमीन, तीन हजार 600 हेक्टर सरकारी क्षेत्र व 11 हजार 200 वनक्षेत्र संरक्षण विभागाच्या विचाराधीन आहे.

राहुरी तालुक्यातील पश्चिम आदिवासी डोंगराळ भागातील वावरथ, जांभळी, बारागाव नांदूरकडील काही भाग, जांभूळ बन, कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, दरडगाव थडी ही गावे संरक्षण विभागाने यापूर्वीच प्राधिकृत केली आहे. ही गावे लष्कराने ताब्यात घेऊ नये, यासाठी या भागातील शेतकर्‍यांनी आमदार, खासदार, मंत्र्यांसह थेट दिल्लीला जाऊन आपली कैफियत मांडली होती. नुकताच के के रेंज क्षेत्रात विळद येथे रणगाड्यांचा मोठा युद्धसराव डेमो लष्करी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाला आणि पुन्हा विस्तारीकरणाचा विषय सुरू झाला.

लष्कराच्या रणगाडे, तोफा, हेलिकॉप्टर व लढाऊ विमाने यांना सरावासाठी क्षेत्र अपुरे पडत असल्याने विस्तारीकरणासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगर तालुक्यातील नांदगाव, विळद, देहरे भागातील जमिनीही जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
राहुरी तालुक्यातील बाभूळगाव, बारागाव नांदूर, वरवंडीलगतच्या भागात मुळा धरणाचे क्षेत्र येते.

युद्ध सरावाच्यावेळी मोठ्या प्रमाणात दारूगोळा, तोफांच्या मार्‍याने या सर्व क्षेत्रातील दहा ते बारा लक्ष टारगेटला किमान एक किमी ते 5 ते सात किमीपर्यंत जोरदार मारा या सरावाद्वारे केला जातो. जानेवारीत विशेष सैनिकी अधिकारी प्रशिक्षणार्थी तिन्ही सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी यांना डेमो पाहण्यासाठी निमंत्रित केले जाते. तसेच नागरिकांसाठीही एक डेमो अलीकडच्या काळात उपलब्ध केला आहे.
यापूर्वी के. के. रेंज युध्द सरावा दरम्यान पारनेर तालुक्यात तोफगोळे के. के. रेंज येथून पडलेले आहेत.

यापूर्वी ढवळपुरी परिसरातील सुतारवाडी, हेमलाचा तांडा, लमाणतांडा ते पळशी, वनकुट्यापर्यंचा भाग के.के. रेंजच्या पट्ट्यात जोडण्याचा प्रयत्न संरक्षण विभागाकडून सुरू होता. आता दोन वर्षानंतर लष्कराचे अधिकारी येऊन गेल्याने चर्चा सुरू झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *