Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निफाड तालुका पुन्हा हादरला; मद्यपी मुलाकडून बापाचा निर्घुण खून

Share

नाशिक | प्रतिनिधी 

पत्नीसोबत होत असलेल्या सततच्या भांडणाला विरोध करणाऱ्या वडिलांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलाने डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालत निर्घुण खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कमलेश निवृत्ती निरभवणे (वय ५३, सोनेवाडी बु, ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आम्ही तीनही भाऊ आणि आईवडील वेगवेगळे राहतो. माझ्या घराशेजारी माझे आई आणि वडील राहतात. माझा भाऊ बबन निवृत्ती निरभवणे दररोज मद्य प्राशन करून आपल्या पत्नीसोबत भांडण करायचा. तसेच पत्नीवर संशयदेखील घ्यायचा. अनेकदा समजावूनदेखील बबन सवय बदलत नव्हता.

गेल्या १५ दिवसांपूर्वी बबन आणि त्याची पत्नी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. बबन पत्नी व मुलांना मारहाण करत असल्याने पत्नी सरला दोन्ही मुलांसह सासरे निवृत्ती मानाजी निरभवणे (वय ७३) व सासूबाई यांच्याकडे निघून गेली होती.

काल दि १७ रात्री आठ वाजेच्या सुमारास बबन मद्यधुंद अवस्थेत हातात कुऱ्हाड घेऊन बायकोला शिवीगाळ करत आला. बबनला आई वडिलांनी समजावून सांगितले मात्र बबन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यादरम्यान, बबनने कुऱ्हाड पत्नीच्या दिशेने उगारत तिच्या अंगावर धावून गेला. याच वेळी वडील निवृत्ती निरभवणे यांनी बबनला धक्का देत सून सरलाला वाचविण्याचा प्रयत्न केला.

याचा राग मनात धरून बबनने वडिलांच्या डोक्यातच कुऱ्हाडीचा घाव घातला. वडील रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले. यानंतर बबनने तिथून पळ काढला. वडिलांच्या डोक्यातून अतिरक्तस्राव झाल्याने त्यांची जागेवरच हालचाल बंद झाली होती अशी माहिती कमलेश निरभवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे.

या प्रकारानंतर निफाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मुलगा बबन निरभवणे फरार असून निफाड पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!