फास्टॅग अंमलबजावणीस आज मध्यरात्रीपासून प्रारंभ

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

टोलनाके गर्दीमुक्त करण्यासाठी आणि वाहनधारकांच्या वेळ व इंधनाची बचत करण्यासाठी फास्टॅग अंमलबजावणीस उद्या शनिवारी मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांसह सर्वच टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एकच लेन राहील. फास्टॅग वाहनांसाठीच इतर सर्व लेन उपलब्ध राहतील.

‘वन नेशन वन टॅग’ ही संकल्पना राबवत देशभर फास्टॅग मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्वच वाहानांनी टोलनाक्यावर फास्टॅगद्वारेच ऑनलाईन आपला टोल भरणे अपेक्षित आहे. त्याची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून होणार होती. परंतु तयारीअभावी आणि फास्टॅग उपलब्धतेच्या संभ्रमामुळे ती पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आली. आता हा नियम 15 डिसेंबरपासून लागू होणार आहे. यादरम्यान मोफत फास्टॅग नोंदणीही केली जात होती. पण 15 डिसेंबरनंतर मात्र आता सर्वच वाहनधारकांना त्यासाठी आवश्यक असलेले 100 रुपयांचे नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

त्यामुळे फास्टॅग लेनमधून बिगर फास्टॅग वाहन गेल्यास फास्टॅग वाहनांचा वेळ वाया जाईल. त्यामुळे संबंधित बिगर फास्टॅगधारक वाहनास दुप्पट टोल लागेल. परंतु जर नियमित टोलधारकांसाठी असलेल्या लेनमधूनचे त्याने प्रवास केला तर मात्र दुप्पट आकारणी होणार नाही. फास्टॅगची सुविधा टोलनाक्यांवर तर आहेच. शहरातील वाहनधारकांना आयडीएफसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक तसेच एअरटेल पेेंमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँकेच्या विविध शाखांमध्ये तसेच अ‍ॅमेझॉनवरही ती ऑनलाईन उपलब्ध आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *