बिनशेती करणे ही ऐच्छिक बाब

एनएच्या सरसकट नोटिसने शेतकर्‍यांमध्ये घबराट

0
नाशिक | दि. ३ प्रतिनिधी- महसूल प्रशासनाने सरसकट शेती क्षेत्रालाही बिनशेतीसाठीच्या नोटिसा पाठवल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. यातील बहुतांशी शेतकर्‍यांच्या द्राक्षबागा आणि इतर फळबागा बागायती क्षेत्र असतानाही त्यांनी बिनशेती का करायची, असा प्रश्‍न उपस्थित करत शेतकर्‍यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे याविरोधात शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून बिनशेती करणे ही ऐच्छिक बाब असल्याने शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शहरात बिनशेतीसाठी विकास आराखड्यानुसार त्या-त्या क्षेत्रासाठी सर्वच खातेदारांना जिल्हा प्रशासानाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

याबाबतचा निर्णय शासनाने १ ऑगस्टलाच घेतल्याने त्यानुसार बिनशेतीची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. परंतु त्याचा आता विपर्यास होत असून शहरातील सर्वच १ लाख ५५ हजार खातेदारांना या नोटिसा बजावत तुम्ही एन.ए. करून घ्या, अशा स्वरुपाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

प्रत्यक्षात शेतकर्‍यांनी आलेल्या नोटिसांना उत्तर देणे अपेक्षित नसून बिनशेती करणे हे केवळ ऐच्छिक आहे. ज्यांना बिनशेती करावयाचे आहे त्यांनीच अपेक्षित पैसे भरून चलन मिळवावे. तसेच आतापर्यंत अपेक्षित प्रयोजनानुसार जमीन अकृषी परवाना घेतला आहे का? नसल्यास त्याचा वापर बदलासाठी अपेक्षित दंड अर्थात आकारच्या वीसपट भरून तो अधिकृत करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

परंतु फळबागा आणि बागायती क्षेत्रांनाही त्याचे वितरण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये याबाबत संभ्रम पसरला आहे. लागलीच शहरातील वडनेर, पिंपळगाव खांब, नांदूर-मानूर, मखमलाबाद, आडगावच्या शेतकर्‍यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी लागलीच जिल्हाधिकारी कार्यालयातील नव्याने निर्मित एन.ए. कक्ष तसेच लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठीही घेण्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

*