शेती महामंडळाची कोट्यवधींची मालमत्ता धुळखात

0

राज्य शासनाचे दुर्लक्ष । 700 एकर क्षेत्र पडीक । अतिक्रमण वाढले

पुणतांबा (वार्ताहर) – राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेती महामंडळाच्या चांगदेव नगरमळ्यावर कोट्यवधी रुपयांची मालमता पडून असून सरकारने लवकर धोरणात्मक निर्णय घेतला नाही तर आहे त्या मालमत्तेची अवस्था आणखीच दयनीय होण्याची शक्यता आहे.
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील पुणेवाडी ‘चांगदेवनगर मळा’ 1963 साली अस्तित्वात आला. मळ्यावर वहिवाटीसाठी अंदाजे 2700 एकर क्षेत्र होते. मुबलक पाट पाण्यामुळे सुरुवातीला मळ्यावर ऊसाचे क्षेत्र 70 टक्के होते. मळ्यावर स्त्री पुरुष कायम व हंगामी कामगारांची संख्या चारशेच्या पुढे होती.
ट्रॅक्टर बैलगाडी वेगवेगळ्या प्रकारची अवजारेसह अनेक प्रकारची यंत्रसामुग्री होती. शेती महामंडळाच्या अधिकारी व कर्मचार्‍यासाठी निवास व्यवस्था होती. 1986 नंतर पाट पाणी कमी झाले. उसाचे क्षेत्र घटले. त्यामुळे महामंडळ डबघाईस आले. त्यातच टप्याटप्पाने खंडकरी शेतकर्‍यांना जमिनीचे वाटप करण्यात आले.
. महामंडळाने जमिनीची मशागत न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे उत्पन्नाचा मार्ग बंद झाला. चांगदेवनगर मळ्यावर सातशे एकर जमीन असूनही ती पडीक आहे. तसेच या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. मळ्यावर मालमत्तेची देखभाल करण्यासाठी हंगामी व कायम मिळून अवघे बारा कर्मचारी आहे.
चांगदेवनगर मळ्यावरील सतरा व आठरावाडी येथे महामंडळाचे कार्यालय गोडाऊन अधिकारी निवास व्यवस्थेच्या इमारती असून त्यांची अवस्थाही खराब झाली आहे. मळ्यावरील शेती संयुक्त पध्दतीने कसण्यास दिली तर कामगारांनाही काम मिळेल व महामंडळाही उत्पन्न मिळेल.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी लक्ष घातले तर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वापरात येईल. शेती महामंडळाच्या प्रश्‍नांबाबत कामगार नेते सुभाष कुलकर्णी यांनी राज्य सरकार तसेच न्यायालयात पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र अजूनही प्रश्‍न मार्गी लागला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची मालमता पडून आहे.

 

LEAVE A REPLY

*