टाकळीभान परिसरात विजेच्या लंपडावाने खरीप संकटात

0

जनरेटरचा वापर करून दिले जाते पाणी

टाकळीभान (वार्ताहर)- जून महिन्यात मृग नक्षत्रात झालेल्या पेरणी योग्य पावसानंतर महिना उलटूनही पावसाने पाठ फिरविल्याने खरिपाची पिके आता माना टाकू लागली आहेत. त्यातच विहिरी व कूपनलिकांना जेमतेम पाणी आहे. मात्र, विजेच्या सततच्या लपंडावाने पिकांना पाणी देणे अवघड झाल्याने खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
टाकळीभान परिसरात मृग नक्षञात झालेल्या दमदार पेरणीयोग्य पावसामुळे परिसरात खरिपाच्या संपूर्ण क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.पेरणी मृग नक्षत्रात झाल्याने पिके तजेलदार होती.खरिपाच्या उत्पादनात चांगली वाढ होण्याची अपेक्षा होती.पावसाने काही काळ ओढ दिल्याने उपलब्ध विहिरी व कूपनलिकांच्या पाण्यावर पाणी देऊन पिके जगविण्यात आली.मात्र मृगाच्या पावसानंतर दमदार पाउसच नसल्याने विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे.पाणीच नसल्याने खरीप पिके मात्र आता माना टाकू लागले आहेत.पिकांना करपत असताना पाहून पाणी देण्याची धडपड शेतकरी करताना दिसत आहेत.
विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी घटत असतानाच विजेच्या लपंडावाचे मोठे संकट उभे राहिले आहे.शेती क्षेत्रासाठी केले जाणारे भारनियमन व त्यातच विजेचा लपंडाव यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.शेतीसाठी आठ ते दहा तास वीजपुरवठा देण्यात येत असला तरी त्याकाळात विजेच्या झटक्यामुळे अर्धावेळ विजेचा लपंडावच सुरू असतो.त्यामुळे पिकाला पाणी देणे शक्य होत नाही.त्यामुळे फूलगळ होत आहे.पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.
त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.एका बाजूने निसर्ग कोपल्याची परीस्थिती तर दुसर्‍या बाजूला विजेचा अनियमित वीजपुरवठा यामुळे खरीप पिकांसोबत शेतकरीही करपला जाऊ लागला आहे.विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेला शेतकरी पिकं वाचविण्यासाठी जनरेटरचा वापर करू लागला आहे. मात्र हा महागडा खेळ आसल्याने तो शेतकर्‍यांना परवडणारा नाही.
मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर त्यासाठी करावा लागतो व त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होउन ते आतबट्ट्याचे होत आहे.मात्र करपत आसलेल्या पिकाची अवस्था पाहून शेतकरी नाइलाजाने हा खेळ खेळत आहे. त्यातच हवामान खात्याकडून दररोजचे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे.त्यावरच विश्वास ठेवून शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.मात्र रोजचा दिवस पावसाविना जात असल्याने शेतकर्‍यांच्या आभाळाकडे लागलेल्या नजराही आता सुकू लागल्या आहेत. खरीप हंगाम हातचा जाणार या भितीने शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामी सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मका, कपाशी, मूग ही सर्वच पिके आता सुकायला लागली आहेत. भांडवली खर्च करून उभी केलेली पिके करपत असताना पाहून तोंडचे पाणी पळाले आहे. पाऊसच नसल्याने विहिरीच्या पाणी पातळीतही मोठी घट झाल्याने पिकांना देण्यास पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने आता सर्वकाही पावसावर अवलंबून असल्याने येत्या आठवड्यात पाऊस पडल ानाही तर खरीप हंगामच करपून जाणार आहे. जळालेल्या पिकांचे पंचनामे करून सरकारने भरपाई द्यावी.
– राजेंद्र कोकणे
उपाध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी

येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाहीतर सर्व पिके हातची जाणार आहेत. विहिरी व कूपनलिकांचे जेमतेम पाणी देऊन काही प्रमाणात पिके वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र विजेचा खेळळखंडोबा होत असल्याने भरणे होत नाही. अनेक वेळा वीज गायब होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. जनरेटरचा वापर करणे शक्य नसल्याने व सर्वसाधारण शेतकर्‍यांना भाडोत्री जनरेटर घेऊन डिझेल व भाडे हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने शेतीसाठी किमान आठ तास वीज सुरळीत व अखंडीत द्यावी.
– भाऊसाहेब दाभाडे, अध्यक्ष, तंटामुक्त समिती 

 

LEAVE A REPLY

*