जाचक अटी न टाकता शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी

0

आमदार बाळासाहेब थोरात  : शेतकरी आंदोलनाचे श्रेय पुणतांबेकरांनाच

संगमनेर (प्रतिनिधी) – इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन संप पुकारला व सरकारवर दबाव टाकला. याचे श्रेय या संपाचे मूळ असलेल्या पुणतांबेकरानांच असून आता सरकारने कोणत्याही जाचक अटी न टाकता शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

राजहंस दूध संघ येथे किसान क्रांती जनआंदोनलाच्यावतीने शेतकरी आंदोलनास प्रथम पाठिंबा दिल्याबद्दल आ. थोरात यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांपुढे ते बोलत होते. यावेळी पुणतांबे येथील धनंजय जाधव, सतिषराव कानवडे, साहेबराव गडाख, जयाजी सूर्यवंशी, संदीप गिड्डे, योगेश रायते, शंकर दरेकर, विजय काकडे, प्रदीप बिल्लारे, किरण सुराळकर, धोंडीराम रायते, सुरेश थोरात, रावसाहेब डुबे, अजय फटांगरे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व सदस्यांनी आ. थोरात यांनी या संपास प्रथम पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

यावेळी आ. थोरात म्हणाले, देशभरातील शेतकर्‍यांमधील असंतोषाचे श्रेय हे पुणतांबेकरांनाच आहे. शेतकर्‍यांच्या मुलांनी एकत्र येऊन त्यांनी अराजकीय काम केले. जिल्ह्याजिल्ह्यातून माणसे जोडणे व असंघटित शेतकर्‍यांचे आंदोलन यशस्वी करून सरकारवर दबाव टाकला ही बाब कौतुकास्पद आहे. आपणही कायम शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलो आहे. आपल्या कृषिमंत्रीपदाच्या काळात शेतकर्‍यांना वेळोवेळी अनुदान दिले. शेतकर्‍यांच्या भावना समजावून घेऊन त्यांच्या आंदोलनाला सर्वप्रथम पाठिंबा दिला.

शेतकरी पुत्र म्हणून काम केले. याप्रश्‍नी कधीही राजकारण केले नाही. आता सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र फार जाचक अटी घातल्यामुळे अगदी मंत्र्यांसह शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शेतकर्‍याला सरकारने मदत केली पाहिजे. कर्जमाफीसाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करून शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. सरकार शेतकर्‍यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत देणार होते. परंतु 2016 पूर्वीचे अल्पभूधारक शेतकरी मग त्याचा लाभ किती जणांना मिळणार? सरकारने शब्दाचा खेळ न करता सरसकट कर्जमाफी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

धनंजय जाधव म्हणाले, शेतकर्‍यांनी एकत्र येऊन संपाची भूमिका पुढे आणली याला कोणतेही राजकीय वळण न देता आम्ही प्रामाणिकपणे काम केले. याकामी सर्वप्रथम शेतकरी प्रश्‍नांची जाण असणारे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या संपाला पाठिंबा दिला. त्यामुळे नगर, नाशिकसह हे आंदोलन राज्यात गेले. आ. थोरात यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत मी कायम तुमच्यासोबत आहे, असे आम्हाला सांगितले.

अगदी पक्षपात, भेदभाव न करता ते जनतेच्या पाठिशी उभे राहिले. याचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुणतांबे येथे येथील पण या संपाला प्रथम आ. थोरात यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करत आहोत. यावेळी जयाजी सूर्यवंशी, संदीप गिड्डे यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक सतिषराव कानवडे यांनी केले. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*