शेतकर्‍यांच्या एकजुटीचे कौतुक

0
पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई,पुणतांबा (प्रतिनिधी)- राज्य सरकारने शेतकर्‍यांना केलेल्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होत असेल तर या प्रश्‍नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांना भेटून त्यावर योग्य तोडगा काढला जाईल असे ठोस आश्‍वासन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुणतांब्याच्या शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला दिले.तसेच शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व असे संपाचे हत्यार उपसल्यामुळेच सरकार शेतकर्‍यांसोबत चर्चा करण्यास तयार झाले, अशा शब्दांत पवार यांनी यावेळी शेतकरी एकजुटीचे मुक्तकंठाने कौतुक केले.

सोमवारी दुपारी 4 वाजता मुंबई येथे पुणतांब्यातील शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. शिष्टमंडळात पाराजी वरकड, अभय चव्हाण, दत्ता धनवटे, विलास पेटकर, अमोल टेके, रवि धोर्डे, दत्तू धोर्डे, संजय चव्हाण, सचिन धोर्डे हे शेतकरी सहभागी होते. कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय झाला असून पंचवीस टक्क्यांची अट रद्द करून पन्नास टक्के करावी व किमान रक्कम पंचवीस हजाराहून दीड लाख करण्यात यावी.

विज बिले माफ करावेत, प्रत्येक गावाच्या ठिकाणी शेतमाल साठवणूकीसाठी अद्यावत गोदाम व्यवस्था असावीत, शेतकर्‍यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशा महत्वाच्या मागण्या शिष्टमंडळाने पवार यांच्यासमोर मांडल्या. तसेच सरसकट कर्जमाफीच्या निर्णयातील काही त्रृटी निर्दशनास आणून दिल्या. पवार यांनी शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच या प्रश्‍नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. शेतकर्‍यांवर कोणताही गुन्हा राहणार नाही, हे त्यांनी शिष्टमंडळास ठोस आश्‍वासन दिले. पवार यांच्याबरोबर एक तास सकारात्मक चर्चा झाल्यामुळे शिष्टमंडळातीत सर्वच शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

पाराजी वरकड व अभय चव्हाण यांनी पवार यांना पुणतांबा येथे येऊन शेतकर्‍यांशी संवाद साधण्याबाबत विनंती केली. याबाबत त्यांनी 5 जुलैपर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यानंतर विचार करेल असे स्पष्ट केल्याची माहिती पाराजी वरकड यांनी सार्वमतशी बोलतांना दिली. 

LEAVE A REPLY

*