शेतकरी संपाचे केंद्र पुणतांबाच!

0

शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभेने शिक्कामोर्तब 

पुणतांबा (वार्ताहर) – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संपाची कल्पना पुढे आणणार्‍या व यशस्वी करून दाखविणार्‍या पुणतांबा या गावाला भेट देऊन येथील शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावरून शेतकरी संपाचे केंद्र पुणतांबा गावच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

संपाचे केंद्र पुणतांब्याहून नाशिकला गेल्याची चर्चा होती, मात्र त्या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे सिध्द झाले आहे. श्री. ठाकरे यांनी कर्जमाफीचे श्रेय हे पुणतांबा येथील शेतकर्‍यांनाच जाते, याचा आर्वजून उल्लेख केला. तसेच शेतकरी संपाची कल्पना आणणार्‍या शेतकर्‍यांचा त्यांनी जाहीर सत्कारही केला.

सभेनंतर त्यांनी किसान क्रांतीचे राज्य समन्वयक व शेतकरी संपाची कल्पना राज्यभर पसरविणारे अथक परिश्रम घेणारे धनंजय जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत चर्चा केली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत पुणतांब्याचे एक शिष्टमंडळ पाराजी वरकड यांच्या नेतृत्वाखाली माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहे.

तसेच श्री. पवार यांना पुणतांबा भेटीचे आमंत्रणही दिले आहे. येत्या काही दिवसांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस आय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणतांबा दौर्‍यावर येण्याची शक्यता असून तशा हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत व झाल्यानंतरही शेतकरी संपाचे केंद्र पुणतांबाच असणार आहे हे अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

*