शेतकरी, कामगारांच्या आत्मीयतेमुळे अगस्ति सुरु

0
अकोले (प्रतिनिधी) – अगस्ति सहकारी साखर काऱखान्याच्या बरोबरीने सुरु झालेले कारखाने बंद पडून डबघाईस गेले. परंतु शेतकरी व कामगार यांच्या आत्मीयतेमुळे अगस्ति सुरु राहीला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतुन अगस्तिने वाटचाल केली आणि यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याला सुमारे 11 लाख रुपयांचा नफा झाला आहे. ही कारखान्याच्या इतिहासातील महत्वाची बाब असल्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक चेअरमन मधुकरराव पिचड यांनी म्हटले आहे.
अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पुजनप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. मिल रोलर पुजन आ.वैभवराव पिचड व माजी चेअरमन प्रकाश मालुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.पिचड होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन तथा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिताराम गायकर, कारखान्याचे संचालक कचरुपाटील शेटे, मिनानाथ पांडे, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, रामनाथ बापु वाकचौरे,
गुलाबराव शेवाळे, भास्कर बिन्नर, सुनिल दातीर, बाळासाहेब ताजणे, सुरेश गडाख, राजेंद्र डावरे, कार्यकारी संचालक भास्करराव घुले, कामगार नेते आनंदराव वायकर उपस्थित होते. पिचड म्हणाले की, अकोले तालुक्यात ऊस वाढीचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. जिल्ह्यात राज्यात पाऊस कमी पडला आहे, अशा परिस्थितीतही तालुक्यातील सर्व धरणे भरली असून या पाण्याचे योग्य नियोजन करुन ऊस वाढीचा कार्यक्रम राबवावा. कधी नव्हे एवढ्या मोठ्या संख्येने यंदाच्या वर्षी शेतकर्‍यांनी तालुक्यात आडसाली ऊसाची लागवड केली आहे.
सिताराम गायकर म्हणाले की, गतवर्षी कारखान्याने 2 लाख 40 हजार मे.टन ऊसाचे गाळप केले. यंदाच्या वर्षी तालुक्यात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात साडेतीन ते पावणेचार लाख मे.टन ऊस असून बाहेरुन दोन ते अडीच लाख मे.टन ऊस आणणार आहे. तर यंदा 6 लाख मे.टनाचे ऊसाचे गाळपाचे उद्दीष्ट असून हे वर्ष कारखान्याच्या प्रगतीला कलाटणी देणारे आहे. कारखान्याचे ऑगस्ट अखेर काम संपेल. सप्टेबरमध्ये चाचण्या होतील, ऑक्टोबरमध्ये कारखाना सुरु होईल. यावर्षी कारखान्यात नविन तंत्रज्ञानचा अवलंब करण्यात आला असून यासाठी 10 ते 15 कोटी रुपये खर्च केल्याचेही गायकर म्हणाले. एकनाथ शेळके यांनी सुत्र संचालन केले व महेशराव नवले यांनी आभार मानले.

कामगारांना भविष्य निर्वाह निधी मिळणार!  – अगस्ति सहकारी साखर काऱखान्याचे कामगारांना भविष्य निर्वाह निधी देणार असून त्यासाठी विमा कंपन्यांशी बोलणी सुरु असल्याचे मधुकरराव पिचड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*