शेतकरी आता मागे हटणार नाही

रुई येथे जाहीर सभेत खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन

0
रुई| दि.९ वार्ताहर- सत्ताधारी पक्षाला निवडून आणुन व पाठींबा देवुन मोठी घोडचूक झाली. त्यामुळे आत्मक्लेश यात्रा काढावी लागली आहे. निवडणूकीपुर्वी शेतकर्‍यांचे संपुर्ण कर्ज माफ करु, शेतीमालाला हमीभाव देवु, स्वामिनाथन आयोग लागु करु असे आश्‍वासन भाजपा नेत्यांनी दिले होते. मात्र सत्तेवर येताच केंद्र व राज्य सरकारने घुमजाव केले. त्यामुळे शेतकर्‍यांना अत्यंत हलाखीचे दिवस पहावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या या प्रश्‍नासाठी सरकार हटवू परंतु आता शेतकरी मागे हटणार नाही असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी केले आहे.

नाशिक येथे आयोजित सुकाणू समितीची बैठक आटोपून भर पावसात गुरुवारी रात्री खा. राजू शेट्टी रुई गावात पोहचले. यावेळी त्यांचे समवेत उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, युवा नेते हंसराज वडघुले, जि.प. सदस्या अमृता पवार, नूतन तालुकाध्यक्ष सुधाकर मोगल, साहेबराव मोरे, सोमनाथ बोराडे, विनोद जोशी आदी उपस्थित होते. येथील आश्रमात माधव पोटे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित सभेत खा. शेट्टी बोलत होते.

हे सरकार हटविण्यासाठी व शेतकर्‍याला कर्जमुक्ती मिळाली पाहिजे यासाठी वेळप्रसंगी सैतानाची मदत घ्यावी लागली तरी चालेल परंतु त्याबाबत आता मागे हटणार नाही. १२ जून रोजी राज्यातील संपुर्ण तहसिल कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन व १३ जून रोजी रेल रोको आंदोलन यशस्वी करण्याचा कानमंत्र त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिला.

प्रारंभी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुभाष रोटे यांनी केले तर प्रास्ताविकात त्र्यंबकराव चव्हाणके यांनी संघटनेची भुमिका विषद करुन संघटनेच्या आजवर वाटचालीचा लेखा-जोखा मांडला. शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, विजबिलात सवलत मिळाली पाहिजे.

तसेच शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी संघटना नेहमीच रस्त्यावर उतरली आहे. यावेळी देखील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर शेतकरी संघटनेने आवाज उठवुन शेतकरी संपाची हाक दिली. त्यास शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिल्याने आता संपुर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असेही त्र्यंबकराव चव्हाणके यांनी म्हटले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी संप यशस्वी करण्याचे आवाहन उपस्थित शेतकर्‍यांना करुन खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करावी असे प्रतिपादन केले.

यावेळी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार माधव दामोधर रोटे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अनिल बोचरे, रत्नाकर शिरसाठ, भाऊसाहेब तासकर, निवृत्ती गारे, संपत घोटेकर, बाबासाहेब गुजर, कोंडाजी गायकवाड, सांडूभाई शेख, जगन्नाथ तासकर, वसंत खडांगळे, ज्ञानदेव गायकवाड, बाजीराव कोकाटे, लिलाबाई तासकर, रावसाहेब रोटे, ज्ञानेश्‍वर तासकर, भागवत शिंदे, प्रमोद गायकवाड, केदारनाथ तासकर आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*