संवादातून साधणार समृध्दी; शेतकर्‍यांच्या मनधरणीसाठी संवादकाची नियुक्ती

0

नाशिक । दि. 8 प्रतिनिधी
नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गासाठी जमीन संपादनास सुरुवात झाली आहे. मात्र अनेक शेतकर्‍यांना जमीन संपादनाबाबत काही प्रश्न आहेत.

काहींना जमिनीचा मोबदला, तर काहींना स्थावर मिळकतींचा मोबदला कसा मिळणार याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 34 समन्वयांची नियुक्ती केली आहे. या संवादकांमार्फत शेतकर्‍यांचे मन वळवण्याचेही प्रयत्न प्रशासन करणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून जाणार्‍या समृध्दी महामार्गासाठी 1290.8 हे. आर जमीन संपादन करण्यात येणार आहे. 49 गावांतील यात सुमारे 3991 शेतकर्‍यांच्या जमिनी बाधित होणार आहे. मात्र या मार्गासाठी जमीन देण्यास काही गावांमधून शेतकर्‍यांचा प्रखर विरोध होत आहे.

समृध्दीबाधित कृती समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी आंदोलनही उभारले आहे. नाशिकमधून इंचभरही जमीन देणार नाही, असे आव्हान शेतकर्‍यांनी दिले असले तरी आतापर्यंत शेतकर्‍यांनी 17 शेतकर्‍यांच्या जमिनींची खरेदी करून त्याचा मोबदला शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

तसेच 300 शेतकर्‍यांनी प्रकल्पास जमीन देण्यास संमती दर्शवली आहे. मात्र काही शेतकर्‍यांना दराबाबत काही प्रश्न आहेत तर स्थावर मिळकतींना किती मोबदला दिला जाणार याबाबतही अनेक शेतकर्‍यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांंंचे शंका-समाधान करण्याकरिता जिल्ह्यातील 34 गावांत संवादकांची नियुक्ती केली आहे.

यापूर्वी मॅजिक आय या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात ज्या ज्या भागांतून हा महामार्ग जात आहे त्या जिल्ह्यांमध्ये संवादकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नाशिकमध्ये संवादकांकडून काहीसा संभ्रम शेतकर्‍यांच्या मनात निर्माण केला जात असल्याने प्रशासनापुढील समृध्दी महामार्गातील अडथळे वाढत होते.

त्यामुळे आता संबंधित गावातीलच हुशार आणि गावाची माहिती असणार्‍या युवकांना संवादक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना दरमहा 15 हजार रुपये मानधनही देण्यात येत आहे. शेतकर्‍यांचे मन वळविण्याबरोबरच त्यांचे शंकांचे समाधान करण्याचे काम या संवादकांमार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*