Type to search

Featured सार्वमत

नगर तालुक्यात शेतकर्‍यांचे आत्महत्यासत्र थांबेना

Share

मेहकरीत तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- बंद केलेल्या चारा छावण्या, पाण्याच्या टँकरच्या कमी केलेल्या खेपा, त्यातच शेतकर्‍यांच्या पाठिशी हात धुऊन लागलेला दुष्काळ यामुळे गेल्या दहा दिवसांत नगर तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची घटना ताजी असताना रविवारी मेहेकरी येधील अतुल पवार (वय 24) या तरुण दूध उत्पादक शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा नसल्याने नगर तालुक्यातील शेतकर्‍यांचे आत्महत्या सत्र थांबायला तयार नाही. सलग तिसर्‍या आत्महत्येने तालुका पुरता हादरला आहे. प्रशासनाकडून या आत्महत्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापुढील काळात आत्महत्या करणार्‍यांनी प्रशासनातील झारीच्या शुक्राचार्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करावी काय? असा सवाल करत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी सुस्तावलेल्या प्रशासनाविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे.

नगर तालुक्यात अजूनही पाऊस पडला नसल्याने बळीराजा अस्वस्थ आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना खाण्यासाठी चारा नाही. अशातच प्रशासनाने जनावरांच्या छावण्या बंद केल्या. काही ठिकाणी पाण्याचे टँकर बंद केले. चाराच उपलब्ध नसल्याने थोड्याफार पावसाने आलेला कोवळा चारा खाल्ल्याने विषबाधा होऊन जनावरे गतप्राण होत आहेत. कोवळ्या गवतातील नायट्रेट पोटात गेल्याने आजवर अनेक जनावरे गतप्राण झाली आहेत. शेतीतील उत्पन्न नाही.

जोडधंदेही अडचणीत आले. शेतीसाठी जोडधंदा असलेल्या दूधउत्पादकांपुढे अडचणींची मालिका उभी ठाकली आहे. प्रशासनाकडून ग्रामीण भागातील जनतेला साथ देण्याऐवजी त्यांचे पाणी व चारा बंद करून त्यांना संकटात ढकलले जात आहे. त्यातून अनेक तरुण शेतकरी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. मानसिकरित्या खचलेले तरुण आता आत्महत्येकडे वळत आहेत. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे प्रचंड हाल सुरू आहेत. मुलांच्या शिक्षण व भवितव्याचे काय? असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

आत्महत्या केलेले शेतकरी भूमीहीन आहेत. त्यांच्या नावावर कर्ज नाही असे सांगत प्रशासनातील अधिकार्‍यांकडून नियमांची फुटपट्टी दाखवत त्यांना सरकारी मदतीपासून वंचित ठेवत आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य कार्ले यांनी जळजळीत प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!