शेतकरी आत्महत्यांची वाटचाल शंभरीकडे; मालेगाव, बागलाणमध्ये संख्या सर्वाधिक

0

नाशिक । जिल्ह्यात झालेला समाधानकारक पाऊस, राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिलेली कर्जमाफी यानंतरही जिल्ह्यात शेतकर्‍यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा यात आणखीनच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी 87 शेतकर्‍यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या. यंदा हाच आकडा 96 वर जाऊन पोहोचला असून जिल्ह्यातील आत्महत्येच्या आकड्याची वाटचाल शंभरीकडे सुरू आहे. गत आठ दिवसांत तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.

शासनाने कर्जमाफी जरी जाहीर केलेली असली तरी शेतमालाला मिळणारे कवडीमोेल भाव, कर्जबाजारीपणा, अतिवृष्टीने हातातोेंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. यातून आलेल्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून आत्महत्येच्या आकडेवारीत सतत वाढ होत आहे. चालू वर्षात तब्बल 96 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असून आत्महत्याग्रस्तांमध्ये युवा शेतकर्‍यांची संख्या 50 टक्के आहे. विशेष म्हणजे कर्जमाफीच्या घोषणेनंरतही या आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात मालेगाव आणि बागलाण तालुक्यात सर्वाधिक शेतकरर्‍यांनी आपला जीवनप्रवास संपवला आहे. निफाडसारख्या सधन तालुक्यातही 12 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली.

राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्त योजना लागू केली. त्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 32 शेतकरी कुटुंंबियांना या योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच ऑक्टोबरअखेरपर्यंत लाभार्थी शेतकर्‍यांना योजनेतून कर्जमुक्त करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.

नोहेंबरचा पहिला आठवडा संपत असतानादेखील शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या नाहीत. ज्या याद्या प्राप्त झाल्या त्यांच्या खात्यात अद्याप कर्जमाफीची रक्क म पडलेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. कर्जमुक्तीकडे डोळे लावून बसलेले शेतकरी सरतेशेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत.

गत आठ दिवसांत तीन शेतकर्‍यांनी नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, जिल्ह्यात 2016 मध्ये 87 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. चालू वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हा आकडा 96 वर पोहोचला आहे. दिवसेंदिवस आत्महत्येचा वाढत जाणारा आकडा बघता सरकार व प्रशासन आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे.

जिल्ह्यातील आत्महत्या
सन संख्या
2014      42
2015     85
2016     87
2017     96 (आतापर्यंत)

तालुकानिहाय संख्या : मालेगाव : 14, बागलाण : 13, निफाड : 12, नांदगाव : 11, दिंडोरी : 10, चांदवड : 09, कळवण : 07, सिन्नर : 06, येवला : 06, नाशिक : 03, त्र्यंबकेश्वर : 03, देवळा : 01, सुरगाणा : 01.

LEAVE A REPLY

*