11 हजार शेतकर्‍यांना सव्वाचार कोटींचे अनुदान!

0

पाच जिल्ह्यांतील 26 तालुक्यांत सोमवारपासून अनुदान सुरू; जिल्हा बँक शाखेत वर्ग 

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – राज्य सरकारने जुलै व ऑगस्ट 2016 या दोन महिन्यांत कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या कांद्यास प्रतीक्विंटल 100 रुपये अनुदान जाहीर केले होते. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 5 जिल्ह्यातील 26 तालुक्यातील 10 हजार 988 कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या 42 लाख 44 हजार 58.52 क्विंटल कांद्यापोटी चार कोटी 24 लाख 45 हजार 852 रुपये संबंधित शेतकर्‍यांच्या नावावर बँकेत वर्ग करण्यात आले आहेत. संबंधित शेतकर्‍यांना या अनुदानाची रक्कम येत्या सोमवारपासून मिळेल, अशी माहिती राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी दिली.
काल दुपारी राहुरी बाजार समितीच्या कार्यालयात राहुरी बाजार समिती येथे जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये विक्रीस आलेल्या शेतकर्‍यांची सविस्तर यादी सहायक निबंधक कार्यालयातील एन. डी. खंडेराय यांच्याकडे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय खुळे, संचालक अ‍ॅड. केरू पानसरे, सुभाष डुक्रे, सचिव प्रकाश डुक्रे उपस्थित होते.
राहुरी बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नाशिक, जळगाव या 5 जिल्ह्यांतील 26 तालुक्यांतील 10 हजार 988 कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी 424458.52 क्विंटल कांदा विकला होता. त्याचे शासनाने जाहीर केलेल्या प्रतीक्विंटल 100 रुपयाप्रमाणे कांद्याच्या अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या संबंधित बँकेत वर्ग करण्यात आली असून त्या शेतकर्‍यांना ही रक्कम 4-5 दिवसांत त्यांच्या खात्यातून काढता येईल, असे सभापती तनपुरे यांनी सांगीतले.
नगर जिल्ह्यातून 11 तालुक्यातील 7 हजार 701 शेतकर्‍यांनी 3 लाख 16 हजार 933 क्विंटल कांदा विकला असून त्यातून त्यांना 3 कोटी 16 लाख 93 हजार 351 रुपये मिळाले आहेत. राहुरी तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांनी कांदा विक्रीस आणला होता, त्यांच्या अनुदानाची रक्कम तालुक्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व शाखांमधील खात्यात वर्ग करण्यात आली आहे. यावेळी रावसाहेब कोळसे, भिकादास जरे, साळुंखे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*