एक हजार व्यापारी बसलेत हात चोळत; संपामुळे व्यवहार होईना; करावा लागतोय सक्तीचा आराम

0

नाशिक : शेतकरी संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडीत घटकांवर विपरीत परिणाम होत असून नाशिक शहरातील एक हजाराहून जास्त भाजीपाला, फळ व्यापारी सक्तीचा आराम करीत आहेत.

मागील पाच दिवसांपासून बाजार समिती आवारात भाजीपाल्याची एकही गाडी दाखल न झाल्याने त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नाशिक बाजार समिती आवारात एक हजाराहून जास्त व्यापारी, 300 हून अधिक आडते तसेच एक हजारपेक्षा जास्त हमाल काम करतात. या सर्वांचा संबंध शेतकर्‍यांशी आहे.

शेतमाल बाजार समितीत आला तरच आडते लिलाव करतात. व्यापारी शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात तर हमाल गाडीतील शेतमाल गाळ्यांमध्ये उतरवणे, चढवणे, गाड्या लोड करण्याचे काम करतात. परंतु पाच दिवसांपासून शेतकरी संपामुळे एकही गाडी भाजीपाला शहरात दाखल न झाल्याने या सर्व घटकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.

व्यापार्‍यांचे दररोज हजारो रुपये बुडत आहेत तर आडत्यांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्याचे पोट हातावर आहे अशा हमाल घटकालाही रोजगार नसल्याने तेदेखील संप मिटण्याची वाट पाहत आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी संपाचा एल्गार कायम ठेवण्याचा निर्धार केल्याने बाजार समितीशी संबंधित या घटकांचे टेन्शन वाढू लागले आहे.

अर्थचक्र फिरतच नसल्याने बँकांमधील भरणा, रोजचा खर्चही थांबला आहे. केवळ व्यापारी, हमाल, आडतेच नव्हे तर बाजार समितीच्या अवारात असलेली 200 ते 300 दुकाने, हॉटेल्सवरही याचा परिणाम होऊ लागला आहे. चहाच्या गाड्या, रसवंत्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या या सर्वांवर संपाचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

भाजीपालाच नसल्याने त्याची वाहतूक करणारे लहान टेम्पाधारक, मोठे ट्रान्सपोर्ट यावरही परिणाम झाला असून भाजीपाला वाहतूक करणारी वाहने बाजार समिती अवारात तसेच अन्य ठिकाणी बंद अवस्थेत आहेत.

LEAVE A REPLY

*