Video : अखेर शेतकरी संप मागे; अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन

0
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मध्यरात्री मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चार तास चाललेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्यानंतर संप मागे घेण्यात येत असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली.
शेतकऱ्यांच्या जवळपास ७० टक्के मागण्या मान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यायला हवा तसेच शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांसाठी शेतकरी एक जूनपासून संपावर गेले होते. संपाचे अनेक ठिकाणी तीव्र पडसाद उमटले होते.

संपाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला. नाशिक, नगरमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले तर अनेक ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आल्याने शेतकरी अधिक संतप्त झाला होता. तसेच संपादरम्यान शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यूदेखील झाला होता.

संपाची तीव्रता बघता मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आवाहन केले होते. मुद्दा महत्वाचा असल्याने मध्यरात्री चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती शेतकरी संप मागे घेण्यात आला आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासने दिली आहेत ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संप मागे घेतलेला दिसत नाहीये. काल आणि परवा सारखीच परिस्थिती सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसत असून सगळीकडे शुकशुकाटच आहे. याठिकाणी एकही वाहन किंवा शेतकरी माल विक्रीसाठी घेऊन आलेला नाही.

तीस जणांच्या कोअर कमिटीने प्रस्ताव धुडकावला असून संपाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.  आज अकरा वाजता नाशिकमध्ये कोअर कमिटीची बैठक होईल त्यानंतर निर्णय घेतला जाणारा आहे. तसेच सोशल मीडियातही संप मागे घेऊ नये असे काही संदेश पोस्ट होतांना दिसत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. येत्या अधिवेशनात त्याबाबत कायदा करण्यात येईल.

राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली जाईल.

दुधाच्या भावासंदर्भात तटस्थ निरीक्षकाची नेमणूकीचा विचार.

वाढीव वीज बिलाचा पुनर्विचार केला जाईल.

थकीत बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय

शीतगृह साखळी निर्माण करणार नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार

शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील, मात्र गुंडावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत.


पुणतांबा परिसरातील जनजीवन सुरळीत सुरू दूध संकलन केंद्रात संकलन सुरू . संपा मागे घेतल्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया.
-राहाता तालुक्यात दुध संकलन सुरू तरी शेतकऱ्यांचा प्रतीसाद कमी दिसून येत आहे.


 

 

LEAVE A REPLY

*