राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांची पैसेवारीत निराशा

0

13 गावांची पैसेवारी 50 पैशाहून अधिक; मंडलाधिकार्‍यांचा प्रताप
हरकती नोंदविण्याचे प्रशासनाचे आवाहन; डिसेंबरला पुन्हा अंतिम आणेवारी

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील मंडलाधिकार्‍यांनी आपआपल्या कार्यालयातच कागदी घोडे नाचवून प्रत्यक्षातील वस्तुस्थिती दडवून राहुरी तालुक्यातील खरीप हंगामातील 13 गावांची सुधारीत आणेवारी जाहीर केली आहे. यातील एकही गाव 50 पैशापेक्षा कमी पैसेेवारीचे नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मंडलाधिकार्‍यांच्या सदोष अहवालामुळे ही 13 गावे आता शासकीय योजनांपासून वंचित राहणार असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर काही हरकती असल्यास माहिती सादर करण्याचे आवाहन तहसीलदार अनिल दौंडे यांनी केले आहे.
राहुरी तालुक्यातील राहुरी, ताहाराबाद, सात्रळ या मंडळातील 13 गावांचा समावेश खरीप पिकांच्या नियमावलीत आहे. तालुक्यातील देवळाली प्रवरा व राहुरी अशा 2 नगरपालिका व 82 ग्रामपंचायतींपैकी केवळ 13 ग्रामपंचायतीचे खरीप लागवड तृतीयांशपेक्षा अधिक आहे. खरीप पिकांची सन 2017-18 ची नजर हंगामी पैसेवारी मंडलाधिकारी ताहाराबाद, सात्रळ व राहुरी यांच्या प्राप्त अहवालानुसार घेण्यात आलेली आहे.
त्यामध्ये वावरथ 60 पैसे, जांभळी 65 पैसे, जांभूळबन 60 पैसे, ताहाराबाद 52 पैसे, गाडकवाडी 52 पैसे, चिंचाळे 52 पैसे, गडधे आखाडा 52 पैसे, म्हैसगाव 60 पैसे, चिखलठाण 62 पैसे, दरडगावथडी 51 पैसे, कोळेवाडी 53 पैसे, वरशिंदे 55 पैसे, वाबळेवाडी 55 पैसे, कानडगाव 55 पैसे, निंभेरे 54 पैसे, तुळापूर 54 पैसे, तांभेरे 55 पैसे याप्रमाणे सर्व 13 गावांची पैसेवारी जाहीर होऊन एकही गाव 50 पैशापेक्षा कमी नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे.
मागील मान्सून काळात ताहाराबाद मंडळासह डोंगराळ भागात तूर, मूग, बाजरी मका या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. शेतकर्‍यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असताना काही प्रमाणात हाता तोंडाशी आलेली पिकेही परतीच्या पावसामध्ये वाहून गेली. यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या होत्या.
शासन मदतीसाठी आणेवारीला प्राधान्य देत असल्याने नुकसानग्रस्त भागाचा समावेश 50 पैसे पेक्षा कमी पैसेेवारीत होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना होती. दरम्यान, महसूल प्रशासनाच्या मंडलाधिकार्‍यांनी खरीप पिकांच्या पाहणीचा अहवाल जैसे थे ठेवून 13 गावांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.
महसूल प्रशासनाने याबाबत संबंधित गावांनी हरकती दाखल करण्याचे सूचित केले असून अंतिम पैसेवारी डिसेंबर महिन्यात जाहीर करणार असल्याची माहिती दिली आहे. यावर निराश झालेल्या शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविण्याचा पवित्रा घेतला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*