Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ऐन दिवाळीत कांदा निर्यातबंदीने शेतकरी संतप्त

Share

शेतकर्‍यांना दिले कर्जमाफीचे गाजर

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- महाजनादेश यात्रेदरम्यान राहुरी येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या शेतकर्‍यांना जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत ही योजना सुरूच राहील, असे गाजर शेतकर्‍यांना दाखविले होते. प्रत्यक्षात मात्र, कर्जमाफी ही शेतकर्‍यांसाठी एक दिवास्वप्नच ठरली आहे. उलट ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी करून सणासुदीचा शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला आहे, अशी भावना शेतकरी नेते राजेंद्र लोढे व शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.

लोंढे म्हणाले, सन 2017 साली नाशिक ते मंत्रालय असा किसान सभेने पायी मोर्चा विधानभवनावर काढला होता. यावेळी मोर्चाला सामोरे जाताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2017 -18 च्या थकबाकीदार शेतकरी बांधवांचा कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तशा सूचना संबंधित बँकांना दिल्या असल्याने कोणताही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. आता कर्जमाफी मिळणार या आशेवर शेतकरी बांधव कालच्या महाजनादेश यात्रेपर्यंत या योजनेची वाट पाहत होते. शेवटी निवडणुका लागल्या. परंतु कर्जमाफीची घोषणा झालीच नाही. कर्जमाफीचे गाजर हे शेवटी शेतकर्‍यांच्यादृष्टीने एक दिवास्वप्नच ठरले.

मागीलवर्षी पडलेल्या भीषण दुष्काळात शेतकरी पुरता होरपळून निघाला. या दुष्काळात काही मिळविण्याच्या आशेने होत नव्हतं ते सार गमावून बसला. यंदा चांगला पाऊस झाला आहे. धरणं भरली आहेत. पण खरिपाला देखील शाप लागला आहे, असेच म्हणावे लागेल. मका लष्करी अळीने खाऊन टाकला. सोयाबीन, बाजरी पावसात भिजली. कपाशीचे बोंड सडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. कर्जमाफी न मिळाल्याने थकबाकीदार शेतकरी बांधवांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे.

या रकमेवरील व्याज अव्वाचे सव्वा झाले आहे. यास जबाबदार कोण? असा सवाल करून लोंढे म्हणाले, मागील दुष्काळात टँकरने पाणी घालून तळहाताच्या फोडाप्रमाणे जतन करून कांद्याचे पीक आणले. सुरूवातीला भाव नसल्याने शेतकर्‍यांनी कांदा साठवून ठेवला. जादा भाव आल्यानंतर सणासुदीला जास्त पैसे होतील, या आशेवर तो थांबला होता. त्याप्रमाणे भाव देखील वाढले. आता आपली दिवाळी आनंदाची होणार, या आशेवर तो जगत होता. परंतु शासनाने निर्यातबंदी करून या आनंदावर विरजण टाकले व हजारो शेतकर्‍यांचे स्वप्नभंग करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले. या प्रकाराने शेतकरी आत्महत्येमध्ये आणखी भर पडण्याची भीती व्यक्त करून शेतकरी पुरता देशोधडीला लागला असल्याचे लोंढे म्हणाले.

यंदा चांगला पाऊस झाल्याने व धरणं भरल्याने शेतकरी पुन्हा ऊस पिकाकडे वळणार आहे. यंदा ऊस नसल्याने साखर कारखाने बंद पडले आहेत. यामुळे सरकारचा देखील कोट्यवधीचा महसूल बुडाला आहे. मात्र, पुढील वर्षासाठी उसाची लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना कर्ज द्यावे लागणार आहे. नसेल कर्जमाफी द्यायची तर कमीतकमी या कर्जाचे पुनर्गठन करणे गरजे आहे. तर पुढील पीक शेतकरी घेऊ शकतात. त्यातच आता केंद्र सरकाराने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकर्‍यांच्या संतापात भर पडली आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!