कर्जमाफीच्या निर्णयाने राहुरी तालुक्यात जल्लोष

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी)- शेतकरी आंदोलनाला यश येऊन महाराष्ट्र शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्वता व अल्पभुधारकांना तात्काळ कर्जमाफीची निर्णय घेतल्याने राहुरीत शेतकर्‍यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात शेतकरी संपाचा मोठा उद्रेक झाला होता. या संपकाळात तालुक्यातील अनेक तरूण शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जाळपोळीच्या घटना घडल्या. सरकारने कर्जमाफीबरोबर आंदोलन काळात ज्या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल झाले आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचाही निर्णय घेतला असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
कर्जमाफीची घोषणा होताच राहुरीत फटाके वाजवुन व शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत जल्लोष करण्यात आला.
या आंदोलनाला राहुरी तालुक्यातील शेतकरी, दुध उत्पादक, भाजीपाला उत्पादक शेतकरी, दुध संकलन केंद्र, दुध शितकरण केंद्र व व्यापार्‍यांनी नुकसान होत असतानाही पाठिंबा देऊन सहकार्य केले त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना, मराठा एकिकरण समिती, प्राजक्त तनपुरे मित्र मंडळ, राहुरी तालुका यांनी सर्वांचे आभार मानले.
व्यापारी असोशियनचे प्रकाश पारख,यांनीही कार्यकर्त्यांसह शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

प्रतिक्रिया

कर्जमाफी चांगली गोष्ट आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरीत कराव्यात. स्वाभिमानी शेतकर्‍यांवर आत्महत्याची वेळ येणार नाही.
– शिवाजीराजे गाडे, जि.प.सदस्य

कर्जमाफीचे स्वागतच आहे परंतू हा फक्त शेतकरी एकजुटीचा विजय आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अन्यथा शेतकर्‍यांना पुन्हा एकदा आपल्या प्रपंचासाठी पक्षविरहित लढा उभारावा लागेल.
– अरूण तनपुरे, सभापती, कृ.उ.बा. समिती, राहुरी.

राज्यातील शेतकर्‍यांच्या संघटीत लढ्याला आलेले हे यश असून दुष्काळाने व नोटाबंदीने शेतीमालाचे भाव पडले यातून शेतकरी पुर्णपणे खचला होता. कर्जमाफीचे स्वागत आहे. राहुरीतील शेतकरी बांधवानी पक्षविरहीत शेतकरी लढा यशस्वी केला. आंदोलनातील शेतकर्‍यांवरील सर्वच गुन्हे मागे घ्यावेत.
– प्राजक्त तनपुरे, नगराध्यक्ष, राहुरी

कर्जमाफीचा निर्णय सरसकट होणे गरजेचे आहे. सर्वच शेतकरी अडचणीत असल्याने इतर शेतकर्‍यांच्या कर्जाबाबतही त्वरीत निर्णय घेऊन हमीभावाचा योगय निर्णय घेणे गरजेचे आहे.
– सत्यवान पवार, बारागाव नांदूर

सर्वच शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होणे गरजेचे आहे. याचप्रमाणे हमीभावाबाबत यथोचित निर्णय त्वरीत घेऊन शाश्‍वत शेतीकडे प्रवास झाला पाहीजे.
– शिवाजीदादा सोनवणे, विरोेधी पक्षनेते राहुरी न.पा.
राज्यातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिलेली मोठी भेट आहे. दूध दरवाढीचा निर्णयही होणार आहे. मुख्यमंत्री घेतलेल्या निर्णयाचा पुर्न:रुच्चार आज झाला आहे. भाजप खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या हिताचे सरकार आहे.
– प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष भाजप.

सरसकट सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ व्हावे. निर्णय चांगला आहे. दुधाचे व शेतीमालाच्या भावाबाबतही संयुक्तरीत्या निर्णय झाला पाहीजे, हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे.
– रावसाहेब चाचा तनपुरे,
अध्यक्ष, राहुरी तालुका काँग्रेस
शेतकरी एकजुटीचा विजय
सरकारने केलेली कर्जमाफी हा शेतकर्‍यांच्या एकजुटीचा विजय आहे. शेतकरी संघटनेबरोबरच शेतकर्‍यांनी केलेल्या नियोजनबद्ध आंदोलनाचा हा विजय आहे. अल्प व मध्यम भूधारक शेतकर्‍यांना या माफीचा फायदा होईल.
– अंबादास कोरडे, जिल्हाध्यक्ष,
स्वाभिमानी शेतकरी संघटना

देेवळाली प्रवरा (वार्ताहर)- देवळाली प्रवरा(वार्ताहर)- शेतकर्‍यांना तत्वता सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर देवळाली प्रवरात या निर्णयाचे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
शेतकरी सुकाणू समिती आणि मंत्री गटाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक संपलीआहे. या बैठकीत तत्त्वत: सरसकट कर्जमाफी द्यायला राज्यसरकार तयार झाले असून अल्प भुधारक शेतकर्‍यांनी कर्जमाफी मिळणार आहे. ज्या शेतकर्‍यांवर आंदोलनात गुन्हे दाखल झालेत, ते मागे घेतले जाणार आहे.
रविवारी सायंकाळी कर्जमाफि निर्णयाचे वृत्त वहिन्यावर प्रसारीत होताच देवळाली प्रवरा शहरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांनी एकच जल्लोष केला.
यावेळी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे, राजेंद्र लोंढे, प्रविण देशमुख, दीपक पटारे, संजय शेरकर, संदीप कदम,नमजी उरहे, संजय कदम, भाऊसाहेब हारदे, श्रीकांत जाधव, सुधाकर कदम, सुरेश वाणी, गणेश भालेकर, बाबासाहेब उरहे, आनंद कोळसे, राकेश कदम, संतोष चव्हाण, किशोर थोरात,गणेश साठे, किशोर वाळके,ज्ञानेश्‍वर भोंडवे, पप्पू कडु आदिसह शेतकरी उपस्थित होते.

उंबरे (वार्ताहर)- शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर ब्राह्मणी येथील आंदोलकांनी गुलाल उधळून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
शेतकरी संपाच्या उद्रकाची सुरूवात तालुक्यात प्रथमच ब्राम्हणीपासून झाली होती. त्यामुळे ब्राम्हणी व उंबरे येथील शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल झाले होते. कर्जमाफी व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करून आंदोलकांनी जल्लोष करत आंनद व्यक्त केला.
याप्रसंगी विठ्ठल मोकाटे गुरुजी, सचिन ठुबे , डॉ राजेंद्र बानकर, प्रशांत शिंदे, रंगनाथ मोकाटे, भारत तारडे, शिवकांत राजदेव, भानुअप्पा मोकाटे, उमाकांत हापसे, सतीश तारडे, निलेश हापसे, राजबाबू हापसे, राहुल हापसे, संजय मोकाटे, चंद्रभान राजदेव, अनिल ठुबे, बापू नवाळे, केशव हापसे, दत्तू तारडे,लक्ष्मण नवाळे, विकास गुजर, राम तारडे, बाळासाहेब हापसे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

नेवासा (तालुका प्रतिनिधी)-राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर नेवासा शहरात आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या मंत्रीगट व आंदोलकांच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर सर्वत्र शेतकर्‍यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नेवासा आठवडे बाजारातील उपस्थित शेतकर्‍यांनी देखील आनंदात आपापली दुकानेच आवरून घेतली व भाजपच्या जल्लोषात सामील झाले.नेवासा शहरातील खोलेश्‍वर मंदिराच्या चौकात फटाके फोडून व पेढे वाटून आमदार मुरकुटे यांनी आनंद साजरा केला. नगरसेवक सचिन नागपूरे, रणजीत सोनावणे, सतीश गायके, बाळासाहेब आढावा,आदी उपस्थित होते.

इतिहासात नोंद घेण्यासारखा निर्णय : आ. मुरकुटे
यावेळी ते म्हणाले, संपाच्या दरम्यानच वरूण राजाने शेतकर्‍यांसाठी पेरणीयोग्य हजेरी लावल्यानंतर शेतकर्‍यांना झालेला आनंद कर्जमाफीच्या घोषणेने द्विगुणीत झाला आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांची आता कर्जाची भावी पिकासाठी गरज असतांना अल्पभूधारकांना लगेच कर्ज मिळण्याचा मार्ग या निर्णयाने मोकळा झाला आहे. कर्ज माफीबरोबरच हा निर्णय देखील अत्यंत महत्वाचा आहे व शेतकर्‍यांची गरज पाहून भाजपा शासनाने घेतलेला हा निर्णय इतिहासात नोंद ठेवणारा असेल.

 

LEAVE A REPLY

*