शेतकर्‍यांचे संप, आंदोलन मागे : पुणतांबा परिसरातील जनजीवन सुरळीत

0
पुणतांबा (वार्ताहर) – परिसरातील शेतकर्‍यांचे आंदोलन मागे घेतल्यामुळे गुरुवारी पुणतांबा परिसरातील जनजीवन सुरळीत झाले आहे. ज्या पुणतांबा गावाने शेतकरी संपाची कल्पना मांडून संपूर्ण राज्यात शेतकर्‍यांचा एल्गार सुरु केला त्या गावात मात्र शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या वेळी उघड उघड गटबाजी दिसून आली.
बुधवारी एका गटाने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून आंदोलनाच्या चळवळीत सक्रीय असणार्‍या शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यामुळे गुरुवारी सकाळ पासूनच पुणतांबा स्टेशन रोडवर शेतकरी व्यापारी खरेदीदार यांनी गर्दी केली होती.
तसेच सकाळी बहुतांशी दूध संकलन केंद्रानी दूध संकलन केले. तसेच टेम्पोमार्फत शेतमाल श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डीकडे रवाना झाला. पुणतांबेकरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सांगली येथील शेतकरी विजय बाळासाहेब जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुरु केलेले उपोषण दुसर्‍या दिवशी राहात्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन मागे घेतले.
यावेळी प्रा. डॉ. एस.आर. बखळे, किशोर वहाडणे, नामदेव धनवटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपोषण सोडण्यापूर्वी श्री. जाधव यांनी पुणतांबा येथील थोडी माती खाल्ली. या क्रांतीकारी भूमीने संपूर्ण देशाला शेतकरी संपाची अभिनव कल्पना दाखवून दिली याबद्दल आभार मानले.
आपण या पुढेही शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी संघर्ष चालू ठेवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संप मागे घेतल्यामुळे आंदोलनकर्ते शेतकरी व त्यांचे नेते ज्या जागेचा वापर करत ती ग्रामसचिवालयाच्या इमारतीसमोरची जागा काल सामसूम वाटत होती. त्यातच आदल्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे गर्दी काहीच नव्हती.
पुणतांबा संपाचे केंद्र बनल्यामुळे अनेक वृतवाहिन्यांचे प्रतिनिधी व त्यांच्या ओबी व्हॅन पुणतांब्यात ठाण मांडून होत्या. त्याही निघून गेल्यामुळे आंदोलनकर्त्याचा उत्साहाच आदल्या दिवशी कमी झाला होता. शेतकरी संपामुळे शेतकर्‍यांचा नेमका किती फायदा होणार याची चर्चा काल दिवसभर पुणतांबा परिसरात सुरू होती. संपामुळे पुणतांबा गावातील स्थानिक राजकारण व गटबाजी सर्वांसमोर दिसून आली. त्याचीही खमंग चर्चा सर्वत्र होत आहे.

LEAVE A REPLY

*