आ. कांबळेंच्या घरासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

0

तूप भेट देत शेतकर्‍यांची खाल्ली चटणी भाकर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्या, शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करा, कर्जमाफी करा इ मागण्या सरकारकडे केल्या असून शेतकर्‍यांच्या संपाचा काल सातवा दिवस होता.

सात दिवस होऊनही सरकारने या संपाकडे गांभीर्याने पाहिले नाही म्हणून काल आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या घरासमोर चटणी भाकर खाऊन व आमदारांना तूप भेट देऊन शेतकर्‍यांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी 20 ते 22 शेतकर्‍यांना ताब्यात घेतले व सोडूनही दिले.
आंदोलक शेतकर्‍यांनी आमदार कांबळे यांच्या धर्मपत्नी तथा माजी नगराध्यक्षा मंदाताई कांबळे यांच्याकडे गावरान तुपाची भेट दिली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकर्‍यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. अटक करण्यात आलेल्या शेतकर्‍यांमध्ये बाळासाहेब पटारे, अहमदभाई जहागीरदार, विलास कदम, डॉ. रोहित कुलकर्णी, विठ्ठल माळी, संदीप उघडे, भास्करराव तुवर, सुरेश पटारे, बाळासाहेब लोंढे, राहुल साळुंके, मनोहर फरगडे, चंद्रकांत चौधरी, मनोज चौधरी, राहुल लबडे, एकनाथ खुरूद, दत्तात्रय पवार यांचा समावेश आहे. यावेळी अ‍ॅड. नारायण तांबे, राजेंद्र कोकणे, रत्नाकर कोरडे, कैलास बोर्डे, संदीप लांडे आदींसह मोठ्या संख्येने अन्य शेतकरी उपस्थित होते.

आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समितीतील शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत आज गुरुवार 8 जून रोजी दुपारी 1 वाजता नाशिक येथील तूपसाखरे लॉन्स, मुंबई नाका, नाशिक या ठिकाणी शेतकर्‍यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, आ. बच्चू कडू, डॉ. अजित नवले, खा. राजू शेट्टी, यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या महामेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे पटारे यांनी केले.

आमदार, खासदारांना त्यांचे पगार, पेन्शन, वाढवून घेण्यासाठी सरकारी तिजोरीत पैसे आहेत. फायद्यासाठी सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधींचे एकमत होते. मात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगतात. शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक संपाच्या पार्श्‍वभूमीवर झोपेचे सोंग घेणार्‍या सरकार व मुख्यमंत्र्यांना सरसकट कर्जमुक्तीचा तातडीने अध्यादेश काढून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यास भाग पाडावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे व जिल्हाध्यक्ष अहमदभाई जहागीरदार यांनी केले. 

LEAVE A REPLY

*