Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शेतकर्‍यांना आता सरसकट कर्जमाफीची प्रतीक्षा

Share

घोषणा केव्हा करणार? शेतकर्‍यांना चिंता

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार राज्यात स्थापन होऊन आठवडा उलटला आहे. निवडणूक प्रचार ते सरकार स्थापनेपर्यंत तिनही पक्षांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा वारंवार उल्लेख केल्याने ठाकरे सरकारकडून कर्जमाफी होण्याची मोठी प्रतीक्षा आता शेतकरी बांधवांना लागली आहे.

कधी नव्हे मागीलवर्षी राज्यात भीषण दुष्काळ पडला. विहिरी, कुपनलिका व धरणं कोरडी पडली. शेतात उभं असलेलं पीक जळून गेलं. अशा भीषण दुष्काळात बळीराजा पुरता होरपळून निघाला. पिकांसाठी घेतलेले कर्ज आहे तसेच राहिले. पाऊस लांबणीवर पडला. नंतर आभाळ फाटेपर्यंत पाऊस झाला. धरणे, बंधारे, ओढे, नाले खळखळून वाहू लागली. परंतु उशीरा झालेल्या पावसाने बळिराजाची पुरती वाट लावली. जून, जुलैमध्ये काही प्रमाणात झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकर्‍यांनी मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी आदी पिके केली. संततधार पावसाने खरीप हिरावून नेला. पावसामुळे कधी नव्हे ते यंदा मुळा व भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याची हॅटट्रीक झाली. जायकवाडी धरणातून देखील ओव्हरफ्लो झाल्याने तिनदा पाणी सोडावे लागले. खरीप दुष्काळाने गेलं आणि रब्बी पावसाने नेलं अशा वाईट परिस्थितीत बळीराजा सापडला.

रब्बी हंगामात पिके उभी करण्यासाठी आज शेतकर्‍यांच्या खिशात दमडी सुध्दा राहिली नाही. डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला. नवीन कर्जासाठी बँका दारात उभे राहू देईना. पीक उभे करायचे कसे? या परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. हे होत असताना वरील तिन्ही पक्षाचे सरकार राज्यात सत्तेवर आले आणि मुख्यमंत्रिपदी उध्दव ठाकरे आले.

आता सत्तेतील तिनही पक्षांनी विधानसभा निवडणुका दरम्यान आपण सत्तेत आलो तर शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करू, असा वचननामा जाहीर केला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना उध्दव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा शब्द दिला आहे. आता जास्त वेळ न लावता शेतकर्‍यांना कर्जमाफी करावी. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या आदेशाची उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत.

यापूर्वी भाजपा सरकारने अर्धवट कर्जमाफी केली आहे. यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. ठाकरे सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून बळिराजाला पुन्हा उभारी द्यावी
– अशोकराव मुसमाडे, राष्ट्रवादी काँग्रेस,जिल्हा कमिटी सदस्य.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी पहिली माहिती शेतकर्‍यांच्या कर्जाची मागितली. त्याप्रमाणे 35 हजार 800 कोटी रुपये कर्जमाफीचा आकडा समोर आला आहे. बळिराजाला शब्द दिल्याप्रमाणे ठाकरे सरकार शेतकर्‍यांचा सात बारा कोरा करणार यात शंकाच नाही.
-सुनील कराळे, शिवसेना शहराध्यक्ष

आता करण्यात येणार्‍या कर्जमाफीला विशेष महत्त्व आहे. शेतकर्‍यांना यातून बाहेर काढण्यासाठी लवकर सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी.
– केदारनाथ चव्हाण. शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!