Thursday, May 2, 2024
Homeनगरअखेर शेतकरी प्रोत्साहन योजनेला मुहुर्त मिळाला

अखेर शेतकरी प्रोत्साहन योजनेला मुहुर्त मिळाला

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजने आंतर्गत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना सरकारने जाहीर केलेली शेतकरी प्रोत्साहन लाभ योजना गेल्या सुमारे दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी रखडली होती. अखेर या योजनेची पहिली लाभार्थी यादी आधार प्रमाणिकरणासाठी बँकेत दाखल झाल्याने नियमित कर्जफेड करणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांनी समाधानाचा श्वास टाकला आहे.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर 2019 ला सरकारने शेतकर्‍यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना लागु केली होती. या योजनेत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ योजना जाहीर केली होती. मात्र संपूर्ण थकित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देवुनही प्रोत्साहन लाभ योजना रखडली होती. महाविकास आघाडी सरकारने दोन-तीन वेळा नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांचा डेटा संकलीत केला होता.

गेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी सुमारे 10 हजार कोटीची तरतुदही केली होती. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांचा हिरमोड झाला होता. मात्र त्यानंतर राज्यात सत्तारुढ झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेला महत्व देवुन पूर्वीचा डेटा रद्द करुन निकषांसह पुन्हा डेटा संकलीत केला. त्यामुळे प्रोत्साहन योजनेचा लाभ कधी मिळणार याची नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिक्षा लागुन राहीली होती.

श्रीरामपुर तालुक्यात नव्या डेट्यानुसार 2 हजार 627 लाभार्थी लाभासाठी पात्र ठरलेले आहेत. नुकतीच सरकारकडुन या पात्र लाभार्थींपैकी 230 लाभार्थ्यांची पहिली यादी आधार प्रमाणिकरणासाठी बँकामध्ये दाखल झाली आहे. श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे टाकळीभान वि.का.सो.चे 88, संत सावता माळी वि.का.सो.चे 23 तर बिग बागायतदार वि.का.सो.चे 27 असे 138 पात्र लाभार्थी आहेत. यापैकी टाकळीभान वि.का.सो.च्या 4 तर संत सावता माळी वि.का.सो. च्या 3 पात्र लाभार्थ्यांचा पहिल्या यादीत सामावेश होवून येथील जिल्हा सहकारी बँकेत आधार प्रमाणिकरणासाठी यादी प्राप्त झालेली आहे. काल शनिवारी सकाळी येथील जिल्हा सहकारी बँकेच्या येथील शाखेत संत सावता माळी वि.का.सो. च्या लाभार्थ्यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत जावुन आपले आधार प्रमाणित केले आहे. त्यामुळे शेतकरी प्रोत्साहन योजनेला अखेर मुहुर्त मिळाल्याचे समाधान लाभार्थी शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत होते.

यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, संत सावता माळी वि.का.सो.चे चेअरमन प्रकाश दाभाडे, संचालक बाबासाहेब बनकर, विलास दाभाडे, बाबासाहेब लोखंडे, शाखाधिकारी पराग ढुमणे, रोखपाल नारायण जगताप, दत्ताञय सोमवंशी, सचिव रामनाथ ब्राम्हणे, प्राचार्य जयकर मगर, किशोर पटारे, मोहन रणनवरे, लक्ष्मण तुपे, रामनाथ पटारे, गोरख बनकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या