शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकर्‍यांचा आधार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आत्मांतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मूग व उडीदाचे संकलन सुरू केल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी उत्पादक संस्थांनी उभारलेल्या शेतकरी सामुहिक सुविधा केंद्रावर शेतकर्‍यांनी माल आणल्यानंतर त्याची स्वच्छता व प्रतवारी केल्यानंतर वखार महामंडळाच्या गोदामात त्याची साठवणूक केली जात आहे.
मागील वर्षी शेतकरी उत्पादक कंपन्यांंच्या माध्यमातून मूग व तुरीला हमीभाव देऊन शेतकर्यांना चांगला बाजारभाव मिळवून मुगाची व तुरीची विक्रमी विक्री करण्याचा उच्चांक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून झाल्याने शेतकरी उत्पादक कंपन्या खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा आधार आहे, असे प्रतिपादन आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी केले.
पिंपरी गवळी येथील शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत मूग व उडीद संकलन सुरू करण्यात आले असून, याची साठवणूक केलेल्या मालाची बर्हाटे यांनी पाहणी केली. यावेळी साठा अधीक्षक एन. आर. वीरमणी, गंगाधर चिंधे, संस्थेचे संचालक भाऊसाहेब थोरात, योगेश थोरात आदी उपस्थित होते.
बर्‍हाटे म्हणाले की, सध्या बाजारभाव कोसळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चांगल्या मुगाचे 4 हजार 800 ते 5 हजार 250 पर्यंत लिलाव होत आहेत. हार्वेस्टरने काढणी केलेला मूग 4 हजार 200 ते 4 हजार 500 दरम्यान विकला जात आहे. केंद्र शासनाने मुगाची व उडदाची 5 हजार 575 हमीभाव जाहीर केला आहे. परंतु शासनाने अद्याप खरेदी सुरू केलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्या व राज्यस्तरीय शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ (महा.एफ.पी.सी.) पुणे यांनी शेतकर्‍यांकडून मूग व उडदाचे संकलन करून गोदामात साठवणूक सुरू केली आहे.
चिंधे व भाऊसाहेब थोरात म्हणाले की, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संकलित केलेला माल नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर नाफेडकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. खरेदीदारांमधील फरक शेतकर्यांना बोनस म्हणून दिला जाईल. शेतकर्यांनी संकलन केंद्रावर शेतीमाल आणताना वाळवून आणावा व त्याची आर्द्रता 12 टक्के असावी. संकलन केंद्रावर स्वच्छता व प्रतवारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे सांगितले.

LEAVE A REPLY

*