उमराळ्यात बायर विरोधात संताप; विषबाधेतील मृतावर अंत्यसंस्कार; मठ्ठ्यातून झाली विषबाधा

0

नाशिक/ उमराळे ता. ९ : बायर कंपनीने आयोजित केलेल्या उमराळे, ता दिंडोरी येथील चर्चासत्रादरम्यान अन्नविषबाधेतून मृत्यूमुखी पडलेल्या अतुल पांडुरंग केदार (वय ४१) या शेतकऱ्यावर आज सकाळी उमराळ्यात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यासंदर्भात कृषी विभाग आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हे चर्चासत्र आयोजित केले होते त्या आबासाहेब केदार यांचा तो चुलतभाऊ असल्याचे समजते. दरम्यान या प्रकरणी विषबाधा झालेल्या सुमारे १०० हून अधिक शेतकऱ्यांवर नाशिक आणि दिंडोरी येथे उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याचे समजते.

या प्रकरणी कालच बायर कंपनी आणि केटरिंगचालक सुनील पोपट वडजे,  रा. मडकीजांब, ता. दिंडोरी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय दरोडे यांनी दिली आहे.

चर्चासत्रादरम्यान दुपारी जेवणात मठ्ठा, जिलेबी आणि पुलाव असे पदार्थ होते. त्यातील मठ्ठ्यातून विषबाधा झाल्याचे समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी जास्त मठ्ठा प्यायला त्यांना अधिक त्रास झाल्याची माहिती येथील प्रत्यक्ष सहभागी शेतकऱ्यांनी देशदूत डिजिटलला दिली.

‘आमच्याच शेतात हा कार्यक्रम आयोजित केला होता. दुपारी १च्या सुमारास आमची जेवणं झालीत त्यानंतर ५च्या सुमारास आम्हाला मळमळ, उलट्या, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. कंपनीच्या लोकांनी मडकीजांब, ता. दिंडोरी येथील आचाऱ्याला जेवणाचे कंत्राट दिले होते. अशी प्रतिक्रिया उमराळे बुद्रूक येथील शेतकरी रमेश धात्रक यांनी दिली.’

श्री. धात्रक यांच्याच शेतात हा चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वत: धात्रक यांनाही विषबाधा झाली असून त्यांच्यासह उमराळे परिसरातील २० शेतकरी सध्या दिंडोरी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

 

बायर कंपनीच्या चर्चासत्रात २०० शेतकऱ्यांना विषबाधा; एका शेतकऱ्याचा मृत्यू; तिघांची प्रकृती चिंताजनक

LEAVE A REPLY

*