Sunday, April 28, 2024
Homeनगर11 हजार शेतकरी पीकविमा मदतीपासून वंचित

11 हजार शेतकरी पीकविमा मदतीपासून वंचित

श्रीरामपूर तालुक्यातील स्थिती : पीकविम्याचा लाभ शेतकर्‍याला की विमा कंपनीला?

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात सात कोटी 93 लाख रुपये तर दुसर्‍या टप्प्यात 19 कोटी 64 लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. मात्र कृषी विभागाने नुकसानीबाबतचा अहवाल विमा कंपनीला सादर करुनही पंतप्रधान पीकविमा भरलेल्या सुमारे 11 हजार 153 शेतकर्‍यांना विमा कंपनीकडून अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे पीक विम्याचा लाभ शेतकर्‍यांना की विमा कंपनीला? असा प्रश्न उपस्थित केला जात असून पीकविमा भरलेल्या शेतकर्‍यांमधून विमा कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

सप्टेबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा श्रीरामपूर तालुक्यातील 31 हजार 806 शेतकर्‍यांना फटका बसला. या पावसामुळे 29 हजार 471.96 हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांची पंचनामे प्रक्रिया पूर्ण करुन याबाबतचा अहवाल कृषी व महसूल विभागाने शासनाकडे पाठवून 27 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती.

त्यानुसार शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी दोन टप्प्यात मदत महसूल प्रशासनाकडे वर्ग केली. पहिल्या टप्प्यात सात कोटी 93 लाख रुपये तर दुसर्‍या टप्प्यात 19 कोटी 64 लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. पहिल्या टप्प्यात 11 हजार शेतकर्‍यांना मदत देण्यात आली आहे.

तर दुसर्‍या टप्प्यातील रकमेपैकी 9 कोटी 55 लाख रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून ती शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामध्ये 7 कोटी रुपये बिगर विमाधारक तर 2 कोटी 55 लाख रुपये पिकविमा विमाधारक शेतकर्‍यांसाठी मदत वर्ग करण्यात आली आहे. तर एक दोन दिवसात उर्वरित शेतकर्‍यांसाठी संबंधित बँकेकडे मदतीची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

दरम्यान, नैसर्गिक संकटामुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकर्‍याला मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने पिकविमा योजना सुरु केली. त्यामुळे शेतकरीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिकविम्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे भरतात. मात्र मागील काही वर्षापासून तालुक्याला पिक विम्याची रक्क्म मिळाली नाही. त्यातच चालू वर्षी अतिवृष्टीने तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

त्यामुळे शेतकर्‍यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीला कळविले. तसेच कृषि व महसुल विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल विमा कंपनीकडे पाठविला आहे. तरी देखील पिकविम्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळाली नाही. तालुक्यातील सुमारे 11 हजार 153 शेतकर्‍यांनी अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे पंतप्रधान पिकविमा भरला आहे. यातून लाखो रुपये विमा कंपनीला गेले आहे. मात्र तरी देखील विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे नुकसान होऊन दोन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील विमा कंपनीकडून मदत मिळत नसल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे.

पीकविम्याची रक्कम मिळाली नाही
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केल्यानंतर नुकसानीचा अहवाल विमा कंपनीला पाठविला आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनीही अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे पीकविम्याची रक्कम भरलेली आहे. मात्र अद्याप विमा कंपनीकडून पीकविम्याची रक्कम प्राप्त झालेली नाही.
– श्री. साळी, तालुका कृषी अधिकारी, श्रीरामपूर.

- Advertisment -

ताज्या बातम्या