Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Deshdoot Impact : हवामान आधारित पीक विमा योजनेचे जिल्ह्याला 15 कोटी; शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात

Share

नाशिक l अजित देसाई

गेल्या खरीप हंगामासाठी हवामान आधारित पिक विमा (WBCIS) योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यावर विमा भरपाईची रक्कम वर्ग करण्यात येत आहे.

खरीप हंगाम 2019-20 मृग बहरासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत हवामान आधारित पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज भरले होते. गेला खरीप अति पावसामुळे वाया गेला असून शेती पिकांसोबतच फळपिकांचे देखील अतोनात नुकसान झाले असल्याने विम्याच्या भरपाईतून हे नुकसान भरून काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

कृषी विभागामार्फत विमा कंपन्यांना नुकसान भरपाई बाबत सूचना करण्यात आली होती. विमा कंपनीकडून याबाबतची कार्यवाही नुकतीच सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात मृग बहरातील पिकांच्या नुकसानीची भरपाईचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील 14932 शेतकरी खातेदारांसाठी 14 कोटी 80 लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून ते संबंधितांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येत आहे.

विमा कंपन्यांनी गेल्या हंगामात 13655 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांसाठी विम्याचा लाभ मंजूर केला आहे. आर्थिक वर्षाच्या सरतेशेवटी हा लाभ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत असून उशिराने का होईना विमा रक्कम पदरात पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तालुकानिहाय मृग बहरातील विमा अनुदान

तालुका –  शेतकरी संख्या –  क्षेत्र – विमा रक्कम

बागलाण – 57- 5501.66 हेक्टर –  4 कोटी 25 लाख 18 हजार,
चांदवड -110 – 73.57 हेक्टर – 12 लाख 9 हजार,
देवळा – 2715 –  2350.76 हेक्टर – 3 कोटी 92 लाख 91 हजार,
कळवण – 34 – 61.92 हेक्टर,
दिंडोरी – 1-  0.55 हेक्टर,
मालेगाव – 4035 – 3797.01हेक्टर – 5 कोटी 31 लाख,
नांदगाव – 83 –  94.91 हेक्टर – 32 लाख 7 हजार,
नाशिक – 11-  24.32 हेक्टर,
निफाड 117 –  92.58 हेक्टर –  10 लाख 18 हजार,
सिन्नर – 2078 – 1611.59 हेक्टर – 76 लाख 68 हजार,
येवला – 48-  46.62 हेक्टर

याप्रमाणे मृग बहरातील फळपिकांना नुकसान भरपाईपोटी विमा अनुदान उपलब्ध झाले आहे. दिंडोरी, कळवण, नाशिक व येवला या तालुक्यातील बाधित क्षेत्रासाठी अद्याप विमा रक्कम प्राप्त झाली नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. एसबीआय लाइफ इन्शुरन्स या कंपनीकडून हे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.


पंतप्रधान पीक विमा योजनेचा देखील लाभ?

जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना आज बँक खात्यावर पंतप्रधान पिक विमा योजनेच्या नुकसानभरपाईचे अनुदान प्राप्त झाल्याचे संदेश प्राप्त झाले आहेत. गेल्या खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. यंदा खरीप हंगामाचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीही न पडल्याने पीक विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत होती.

शासनाने खरिपाच्या नुकसानीपोटी सरसकट अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला आहे असे शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले होते. अखेर उशिराने का होईना या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असल्याचे बँक खात्यावरील संदेशामुळे दिसून आले.

यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे विचारणा केली असता, खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे याबाबत कृषी विभाग देखील अनभिज्ञ आहे. विमा कंपनीकडून अधिकृत माहिती अद्याप मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


सिन्नरच्या शेतकऱ्यांकडून देशदूत चे आभार

गेल्या महिन्यात ‘देशदूत’ने सिन्नर तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या भावनांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. ‘देशदूत’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींना शासनापर्यंत पोचवण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर आज वावी परिसरातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्याचे बँकेचे संदेश प्राप्त झाल्याने आनंद झाला. देशदूतच्या माध्यमातून आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचला असे सांगत या शेतकऱ्यांनी ‘देशदूत’चे आभार मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!