‘कोणता पेरा घेऊ हाती?’ शेतकर्‍यांची संभ्रमावस्था

0

कांद्याने रडू आणले; तुरीने अंगठा दाखविला; आर्थिक नाकेबंदीत कपाशी अडकली

राहुरी (प्रतिनिधी) – ढोरमेहनत करूनही मागील वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांतून शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडले नाही. कांदा मातीमोल भावाने गेल्याने शेतकर्‍यांना रडू कोसळले, हरभरा, बाजरी, गव्हाचे भाव कोसळले, शासन दरबारी तुरी विकता-विकताच शेतकर्‍यांच्या नाकी नऊ आले, नोटाबंदीच्या चक्रव्यूहात कपाशी अडकल्याने व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांची आर्थिक नाकेबंदी केली. जिल्ह्यातील कारखान्यांकडे उसाचे पेमेंट थकल्याने उसाच्या मळ्याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली. सोयाबीनच्या भावाने शेतकर्‍यांना अंगठा दाखविला. त्यामुळे गतवर्षी मोठ्या नुकसानीत गेलेल्या राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांची ‘औंदा कोणता पेरा घेऊ हाती?’ अशी संभ्रमावस्था झाली आहे.
मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडला. मुळा धरण पूर्ण क्षमतेने दोनदा भरले. तर वर्षभरात मुळा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आवर्तनाचे नियोजनही पाटबंधारे खात्याने काटेकोरपणे पाळून भर कडाक्याच्या उन्हाळ्यातही काळजीपूर्वक डाव्या व उजव्या कालव्यातून आवर्तन दिले. त्यामुळे राहुरी तालुक्यात भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई न भासता ‘पाणीच पाणी चोहीकडे’ अशी अवस्था झाली. पाण्याची शाश्‍वती मिळाल्याने मागील वर्षी रब्बी व खरीप हंगाम कमालीचा यशस्वी झाला. कांदा व तूर, सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र, या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भावच मिळाला नसल्याने यंदाच्या मान्सूनपूर्व हंगामात बळिराजा हतबल होऊन बसला आहे.
मागील वर्षी भावाची घसरगुंडी झाल्याने यंदाच्या हंगामात कांदा, तूर, सोयाबीन, कापूस ही पिके करण्याचे धाडस शेतकर्‍यांमध्ये राहिलेले नाही. मागील वर्षीचीच तूर विकताना शेतकर्‍यांच्या तोंडातून फेस येत आहे. त्यामुळे यंदा पुन्हा तूर करायची का? असा संभ्रम शेतकर्‍यांना पडला आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस पडण्याच्या हवाला हवामान खात्याने दिला आहे. मात्र, पिकांच्या उत्पादनात नुकसानीत गेलेले शेतकरी चक्रव्यूहात अडकले आहेत. भरवशाच्या असलेल्या गव्हालाही समाधानकारक बाजारभाव भेटला नाही. काही शेतकर्‍यांना कांदा अक्षरशः फेकून द्यावा लागला. भाजीपाल्यांच्या पिकांनाही घसरलेल्या बाजारभावाचा फटका बसला. सोयाबीन व कापसाच्या बाबतीत हमीभावात शेतकर्‍यांची फसगत झाली.
मान्सूनच्या आगमनाला आता केवळ पंधरवड्याचा अवधीच शिल्लक राहिला आहे. वैशाख वणव्याचा वनवास संपून 26 मे रोजी ज्येष्ठ मासारंभ होणार आहे. तर 8 जूनला मृग नक्षत्राचे आगमन होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी मान्सूनपूर्व मशागती सुरू केल्या आहेत. मात्र, मशागतीनंतर काय? असा सवाल शेतकरी परस्पराना करीत आहेत.

भुसार मालाच्या उत्पादनात शेतकर्‍यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागते. त्यापेक्षा उसाची नगदी शेती बरी, अशी मानसिकता शेतकर्‍यांची झाली आहे. त्यामुळे यंदा राहुरी तालुक्यात उसाची लागवड मागील वर्षीच्या तीन हजार हेक्टरवरून नऊ हजार हेक्टर होणार असल्याचा अहवाल कृषी खात्याने दिला आहे. त्यातच यंदाच्या गळिताला डॉ. तनपुरे कारखाना सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्याने शेतकरी पुन्हा उसाचे मळे फुलविण्याचे धाडस करणार आहेत.   

LEAVE A REPLY

*