शेतकर्‍यांना कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी शक्ती द्यावी

0

गंगागिरी महाराजांकडे मुख्यमंत्र्यांचे साकडे, सरला बेट विकास प्रस्तावाचा केंद्राकडे पाठपुरावा करणार

 

महेंद्र जेजुरकर

गंगापूर – राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तसेच कर्जमाफीकडून कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी आणि बळीराजाच्या जीवनात परिवर्तन यावे या करीता खर्‍या अर्थांने आम्हाला शक्ती द्या, आशिर्वाद द्या, असे साकडे गंगागिरी महाराजांकडे घालतानाच, ‘सरला’ बेटाच्या विकासासाठीच्या प्रस्तावाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन प्रस्तावाच्या मंजूरीसाठी मी स्वत: प्रयत्न करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंगापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र गवळी शिवरा येथे आयोजित श्री सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज 170व्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याप्रसंगी दिली.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा येथील सद्गुुरु गंगागिरी महाराज 170 व्या अखंड हरिनाम सप्ताहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या मागण्यांचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना तसेच संपूर्ण जनसमुदायाला आश्‍वासित केले.

 

 

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, नगरचे पालकमत्री प्रा. राम शिंदे, अहमदनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, महापौर भगवान घडामोडे, महंत रामगिरी महाराज, महामंडलेश्‍वर शांतीगिरी महाराज, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार तथा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत बंब, साईसंस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, आमदार भाऊसाहेब कांबळे, सचिन गुजर, दीपक पटारे, आ. सुभाष झांबड, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिकाताई राजळे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गंगागिरी महाराजांनी शक्ती आणि भक्तीची जोपासना करत आमच्यामध्ये ऊर्जा प्रज्वलित राहिल अशा प्रकारचा हरिनाम सप्ताह अखंडपणे 170 वर्षांपासून सुरू ठेवला आहे. खरोखरच हे एक जगातलं आश्‍चर्यच आहे. 19 व्या शतकात सप्ताहाची सुरुवात झाली. 20 व्या शतकात सप्ताह सुरुच राहिला. पुढे एकविसावे शतक आले तरीही सप्ताह सुरु आहे. शतकामागून शतके जातील तरीही हा सप्ताह अशाच प्रकारे सुरू राहिल, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, भक्तीच्या माध्यमातून आज खर्‍या अर्थाने आपली मानवता जीवंत आहे. या भक्तीच्या माध्यमातून अनेक घटक एकत्र येऊन अखंड हरिनामाच्या सप्ताहात रुपांतर झाले आहे. या सप्ताहाचे प्रमुख गंगागिरी महाराज तसेच रामगिरी महाराज यांच्यामुळे आपल्याला एक नवी उमेद मिळते. जीवनामध्ये सद्मार्गाने चालण्याची संधी मिळते आणि गुरुंच्या माध्यमातून जे अध्यात्माचे ज्ञान प्राप्त होते ते चिरंतन टिकणारे असते, असे ते म्हणाले.

 

 

मुख्यमंत्री म्हणाले, मनुष्याला केवळ लौकीक ज्ञान आणि भौतिक संपत्ती प्राप्त होऊन फायदा नाही कारण ज्यांच्याकडे भौतिक संपत्ती आहे त्यांना रात्री झोप येत नाही. मात्र बळीराजा हा आपला शेतीत राब-राब राबतो, रक्ताचं पाणी करतो त्याच्याकडे भौतिक संपत्ती नसली तरी हरिनामाचा जप केल्यानंतर त्याला रात्री शांत झोप येते. त्याला बाकीची चिंता करण्याची गरज नाही कारण त्याला माहिती आहे, मी मेहनत करतोय तर माझा हरि माझी चिंता करतोय, ही ताकद केवळ अध्यात्मामध्ये असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गुरुंनी आपल्याला जे आशिर्वाद आणि ज्ञान दिले आहे त्या ज्ञानाची ही ताकद आहे. हेच ज्ञान खर्‍या अर्थाने आपल्याला आज्ञानापासून ज्ञानाकडे आणि शांतीकडे नेते. ही शांती तेव्हाच शक्य आहे, जेव्हा प्रत्येक व्यक्तीला हरिनामाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होईल. हे ज्ञान देण्याचे महत्त्वाचे कार्य गंगागिरी महाराज यांनी केले आहे.

 

 

यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा गेल्या 170 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. श्रध्दा आणि भक्ती शांतीमय जीवन जगण्यासाठी असे सप्ताह उपयोगी पडत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, सर्वांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

 

 

या हरिनाम सप्ताहासाठी सात दिवसांमध्ये राज्यातून जवळपास 25 ते 30 लाख भक्त येऊन गेले असून आज सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला 10 लाख भक्तगण येथे उपस्थित असल्याचे आमदार तथा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी सांगितले.

 

 

महंत रामगिरी महाराज यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राच्या योजनेचा निधी बेटासाठी द्यावा, याचा पाठपुरावा करण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालावे, 100 कोटींचा हा प्रस्ताव असून त्यास सहकार्य करावे, असेही महाराज म्हणाले.

 

महासागर अन जनसागर!
आपण सप्ताहासाठी मुंबईतून विमानाने निघालो, त्यावेळी महासागराचे पाणी पाहिले. त्याला हात जोडले. इथे सप्ताहाला आलो. तर इथे भाविकांचा जनसागर पाहिला. आपण या जनसागराला नतमस्तक होत आहोत, असे म्हणताच भाविकांनी त्यांना टाळ्या देत त्यांचे स्वागत केले.

 

फुगडी राहिली!
सप्ताहातील राजकीय मंडळींची फुगडी चांगलीच रंगते. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फुगडी या सप्ताहात होईल, अशी नगरच्या भाविकांमध्ये उत्सुकता होती. विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने विखे पाटील यांना या सांगतेला येता आले नाही. मुख्यमंत्री आले होते. फुगडीच्या पूर्वीच मुख्यमंत्री अधिवेशन असल्याने निघून गेले होते.

 

सत्संगाचा जागतिक विक्रम सत्संगाचा जागतिक विक्रम या सप्ताहामध्ये प्रसादाच्या स्वरुपात 10 लाख भक्तांना बुंदीचे लाडू 8 मिनिटांमध्ये वाटण्याचा आणि एकाचवेळी 10 लाख भक्तांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होण्याचा असे दोन जागतिक विक्रम यावेळी घडले. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना यावेळी प्रदान करण्यात आले.

LEAVE A REPLY

*