शेतकरी संघटनांचे संगमनेरात उद्या चक्काजाम

0
संगमनेर (प्रतिनिधी) – शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने विविध मागण्यांसाठी सोमवार 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.
शेतकर्‍यांचा अभूतपूर्व संप व आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी व शेतकर्‍यांच्या जागृत झालेल्या तरुण पोरांनी सरकारला शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यास भाग पाडले.
मात्र शासन दररोज एक नवा अध्यादेश काढून कर्जमाफी प्रक्रिया किचकट करत आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाचे एक पाऊल पुढे गेले आहे. शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी, शेतीमालाला रास्त भावासाठी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी हे आंदोलन होत आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव (संगमनेरचा दक्षिण भाग), चिखली (संगमनेरचा पश्‍चिम भाग), हॉटेल स्टेटस (संगमनेरचा उत्तर भाग), वडगाव फाटा (संगमनेरचा पूर्व भाग) व संगमनेर बसस्थानकासमोर (आम्ही शेतकर्‍यांची पोरं, शाळा, कॉलेज मुलं, मुली) अशा पाच ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार आहे. तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे राज्य संयोजक डॉ. अजित नवले यांनी केले आहे.
सरकारला मात्र शेतकरी आंदोलन शांत झाल्याचा समज झाला आहे. शेतकर्‍यांनी मैदान सोडल्याचा मोठा गैरसमज सरकारने करून घेतला आहे. कर्जमाफीसाठी व पीकविम्यासाठी ऑन लाईन किचकट पद्धत राबविली जात आहे. यामुळे सरकारचा गैरसमज दूर करण्यासाठी संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी 14 ऑगस्ट रोजी चक्काजामची हाक देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*