पेरण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग

0

40 हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा,
3 लाख 90 हजार कपाशीचे पाकीट उपलब्ध

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरशहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे खरिपासाठी लागणारे खते, बी-बियाणे शेती अवजारे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे. लवकरच खरिप हंगामातील पेरण्या सुरू होणार असून पावसाच्या दमदार सुरूवातीमुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात कडधान्यांचे क्षेत्र वाढणार आहे. काही ठिकाणी कपाशीची लागवड सुरू झाली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळ्या आहेत. त्यात गेल्या सात दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांत पाऊस झाला. शुक्रवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. शुक्रवारी जिल्ह्याच्या बहुतेक भागात रात्रभर संततधार झाली.
शनिवारी सकाळी काही काळ विश्रांतीनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, राहाता, नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदे या तालुक्यांत आतापर्यंत 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक तालुक्यांत पावसामुळे शेतीत पाणी साचले आहे. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नगर तालुक्यातील नालेगाव, जेऊर, रुईछत्तीशी, कापूरवाडी, केडगाव, चास, भिंगार, नागापूर, वाळकी, चिचोंडी पाटील, सावेडीसह शहराच्या बहुतांश भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 15.27 टक्के पाऊस झाला आहे.
पावसाला चांगली सुरुवात झाल्यामुळे शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकर्‍यांनी नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी केली आहे. नगर जिल्हा हा खर्‍याअर्थाने रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात खरिपाच्या क्षेत्रात मोठी वाढ होतांना दिसत आहे. विशेष करून कपाशीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. गेली काही वर्ष दुष्काळाने होरपळत असतांना शेतकर्‍यांनी कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आहे.

आतापर्यंत झालेला पुरवठा (क्विंटलमध्ये)
भात 2 हजार 656, ज्वारी 17, बाजरी 3 हजार 204, मका 3 हजार 709, मूग 2 हजार 484, सोयाबीन 4 हजार 997, भुईमूग 1 हजार 160, कपाशी 3 लाख 85 हजार पाकिटे, युरिया 1 लाख 52 हजार मेट्रीक टन, डीएपी 7 हजार 123 मेट्रीक टन, एमओपी 4 हजार 992 मेट्रीक टन. 

घरगुती बियांणाचा वापर करावा
गतवर्षी सोयाबीन, तुर, मुग, उडिद आदी प्रमाणित बियाणे घेवून पेरणी केली असल्यास त्याचा बियाणे म्हणून वापर करावा.त्यामूळे बियाणासाठी लागणारा अनावश्यक खर्च टाळता येईल.याशिवाय पेरणीपूर्वी घरगुतीपद्धतीने शंभर दाणे ओले करुन फडक्यात किंवा पेपरमध्ये गुंडाळन त्याची उगवण क्षमता तपासावी.

अशी घ्यावी काळजी
दर्जेदार व गुणवत्तापूर्वक बियाणे घेण्यासाठी शेतकर्‍यांनी गुणवत्तेची हमी देणार्‍यांकडूनच बियाणे खरेदी करावी. बनावट बियाणे खरेदी टाळण्यासाठी कृषी केंदाकडून पावती घ्यावी. त्यावर कंपनीचे नाव, वाण, बियाणे हे या हंगामासाठीच आहे की नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाणामधून थोडे बियाणे पिकाची सोंगणी होईपर्यत जपून ठेवावे. बियाणे सिलबंद असल्याची खात्री करावी.ओलसर जागी खताजवळ बियाणांची साठवण करू नये, सोयाबीन बियाण्याला पेरणीपूर्वी बुरशीनाशक व जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया अवश्य करावी. बियाणाची पेशवी खालुन फोडून टॅग जपून ठेवावा.

LEAVE A REPLY

*