पिंपरी शहालीच्या शेतकर्‍याची आत्महत्या सावकाराच्या जाचामुळे

0

पत्नीच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपरी शहाली येथील कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या पत्नीने काल नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव तालुक्यातील एका सावकारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सुनीता अशोक भालकर (रा. पिंपरी शहाली ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझे पती अशोक यांना पैशाची गरज असल्याने लोकांकडून उसने घेतलेले पैसे द्यायचे होते. त्यांनी दहीगाव ता. शेवगाव येथील सावकार कारभारी आढाव यांना आमचे शेत गट नंबर 91 मधील आमची 40 आर शेतजमीन कायम खरेदीखताने 22 मार्च 2017 रोजी दिलेली होती. त्याचबरोबर त्याच गटातील पती अशोक यांची 20 आर व दीर गोरक्ष यांच्या नावावरील 60 आर अशी एकूण 80 आर जमीन कारभारी आढाव याने स्वतःची पत्नी कडूबाई कारभारी आढाव यांच्या नावावर त्याच तारखेला खरेदी करून घेतली होती.

त्याबदल्यात सावकार कारभारी आढाव याने माझे पती अशोक व दीर गोरख यांना प्रत्येकी 5 लाख 5 हजार रुपये दिले होते. सदरचे पैसे 3 टक्के व्याजासह परत दिल्यावर सदर जमीन पुन्हा नावावर करून देतो असे सांगितले होते. त्यासाठी तोंडी 2 वर्षांची मुदत दिली होती. असे माझे पती यांनी मला सांगितले. खरेदी केलेल्या जमिनीपैकी सावकार कारभारी आढाव याने माझे पती यांच्या नवावरील 40 आर जमीन तलाठ्यामार्फत सातबारा उतार्‍यावर स्वतःच्या नावावर केली होती. परंतु कडूबाई यांच्या नावावर खरेदी केलेली 80 आर जमीन ही त्याने स्वतःच्या पत्नीच्या नावावर करून घेतलेली नाही. सदरची शेतजमीन ही खरेदी केल्यावर सावकार आढाव हा आमच्या घरी दर महिन्याला येऊन व्याजाचे पैसे घेवून जात असे. असे साधारण वर्षभर चालल्यानंतर सावकार आढाव व्याजाची रक्कम 5 टक्के दराने द्यावी अशी मागणी करू लागला त्यानंतर माझे पती यांच्याकडे असलेले 5 लाख 5 हजार रुपये माझे भाऊ सुहास गंगाधर घोडेचोर, शरद गंगाधर घोडेचोर यांच्याकडून घेऊन सावकार कारभारी आढाव यास परत केले तरीही व्याजाचे पैसे जास्त होतात.

ते दिल्याशिवाय आमची खरेदी केलेली जमीन नावावर करून देणार नाही असे म्हणून टाळाटाळ करू लागला. यामुळे माझे पती अशोक यांना मानसिक त्रास होत होता. सावकाराने फसवल्यामुळे मला आता जीवन संपवल्याशिवाय पर्याय राहिला नाही असे ते म्हणत होते. सावकाराच्या जाचाला कंटाळून विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. या फिर्यादीवरून कारभारी आढाव व कडूबाई आढाव दोघेही रा. शेवगाव यांच्याविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम वाबळे करत आहेत.

LEAVE A REPLY

*