आत्महत्याग्रस्तांमध्ये कांदा, डाळिंब, द्राक्षोत्पादक अधिक

निफाड, मालेगाव, बागलाणमध्ये सर्वाधिक आत्मघात

0
नाशिक | दि. १८ सोमनाथ ताकवाले- जिल्ह्यात गत अडीच वर्षांत ज्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यात निफाड, मालेगाव, बागलाण, सिन्नर, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, कळवण या तालुक्यांतील शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर या शेतकर्‍यांची पीक पार्श्‍वभूमी द्राक्ष, डाळिंब आणि कांदा पीक क्षेत्राची आहे. ज्या तालुक्यात या आत्महत्या झालेल्या आहेत त्या तालुक्यांमध्ये कांदा, द्राक्ष आणि डाळिंब पीक अधिक होते.
यंदा नैसर्गिक आपत्ती अभावाने शेतीवर कोसळलेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे पीक नुकसान होण्याचे प्रमाण घटलेले आहे. असे असताना या वर्षी जिल्ह्यात गत दीड वर्षाच्या तुलनेत शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आत्मघात केलेल्या शेतकर्‍यांमध्ये वयस्क शेतकर्‍यांसह युवा, तरुण आणि होतकरू शेतकर्‍यांची संख्याही अधिक असल्याने, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा हे तालुके जिल्ह्यात कांदा उत्पन्नासह, डाळिंब आणि काही प्रमाणात द्राक्ष उत्पादनात अगे्रसर आहेत. त्याचबरोबर मका, तूर, बाजरी, ज्वारी बरोबर इतर पिके या भागात घेण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र तरीही या भागातून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांमध्ये मालेगाव सर्वोच्च स्थानी आहे. येथे गत अडीच वर्षांत ३८ शेतकर्‍यांची आत्महत्या झाल्याची नोंद सरकारी दप्तरी झालेली आहे. त्यानंतर सटाणा तालुक्यात २५ शेतकर्‍यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. कळवणमध्ये ९ तर देवळा तालुक्यात ५ शेतकर्‍यांनी मृत्युला कवटळलेले आहे.
निफाड तालुका हा जिल्ह्यात सधन तालुका म्हणून प्रचलित तर आहेच, शिवाय येथे जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र द्राक्ष, कांदा पिकांचे आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांदा आणि द्राक्ष निर्यात करणारे व्यासपीठ याच तालुक्यात पिंपळगाव बसवंत, लासलगावच्या परिघात आहे. पण जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचा तालुका म्हणून निफाड तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. निफाडमध्ये ४८ शेतकर्‍यांच्या आत्महत्या गत काही कालावधीत झालेल्या आहेत. आत्महत्याग्रस्तांची या तालुक्यातील अधिक संख्या पाहून जिल्हा गहिवरून गेलेला आहे.
येवला, नांदगाव, चांदवड आणि सिन्नर हे कांदा, डाळिंब उत्पादकांचे तालुके म्हणून प्रचलित आहेत. गेल्या वर्षी पाण्याअभावी उभ्या डाळिंब बागा होरपळून गेल्या होत्या. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता. कांद्याचे पीकही यंदा अवाच्या -सव्वा झाल्याने, त्याचे दर घसरलेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक नुकसानीच्या कैचीत सापडलेले आहेत.

जिल्ह्याच्या पूर्वभागात असलेल्या नांदगाव तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रमाण सर्वाधिक १९ आहे. चांदवडमध्ये १६ शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आर्थिक विवंचना असल्याचे चिठ्ठ्यांमध्ये आपल्या पश्‍चात लिहून ठेवलेले होते. त्याचबरोबर सिन्नरमध्येही १५ शेतकरी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवलेली आहेत. येवलामध्येही ७ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवून टाकलेली आहे.

शेतकरीच अनुदान देतोय!

तोट्यात शेतमाल विकणार्‍या शेतकर्‍याच्या जीवावर बाजारात जे नफा कमवतात ते एक प्रकारे शेतकर्‍याने स्वतः झळ खावून दुसर्‍यांना दिलेले अनुदान ठरते. शेतकर्‍यांच्या पिकांचे उत्पन्न मूल्य आणि बाजारात विकल्या जाणार्‍या पिकाचे दर यात कायम तफावत असते. शेतकर्‍यांना त्याचे उत्पन्न मूल्य माल विक्रीतून मिळत नाही. मात्र बाजारात इतर जण शेतकर्‍यांच्या उत्पन्न मूल्याच्या अधिक किमतीत माल विक्री करतात. शासन शेतकर्‍यांना अनुदान देण्याचे कायम म्हणत असते. मात्र प्रत्यक्षात शेतकरी आपल्या मालाचे उत्पन्न मूल्य निघत नसतानाही कमी दराने माल विक्री करून बाजारघटकांना उपकृत करीत असतो, याचा विचार कोणीच करताना दिसत नाही.
जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, द्राक्ष निर्यातदार संघटना

 

LEAVE A REPLY

*