शेतकरी संप सुकाणू समितीची आज बैठक

0
नाशिक | दि. ७ प्रतिनिधी- शेतकरी संपाची आगामी दिशा कशी असावी यासाठी शेतकरी संप सुकाणू समितीची बैठक उद्या गुरुवारी दुपारी १ वाजता येथील तुपसाखरे लॉन्स येथे होणार आहेे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, आ. बच्चू कडू, शेतकरी समन्वय समितीचे अजित नवले, नामदेव गावडे, अशोक ढवळे, राजू देसले यांच्यासह राज्यातील २०० समाजसेवी व सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

राज्यव्यापी शेतकरी संपाचा नाशिक जिल्हा केंद्रबिंदू झाल्यानंतर शेतकरी संप समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नाशिक येथे होत आहे. दरम्यान, संप सुरू होऊन उद्या आठ दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे शेतकरी संप सुकाणू समितीच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवणारी काय चर्चा होते, याकडे राज्यातील शेतकरी आणि बाजार समित्यांच्या वर्तुळातील घटकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान आज प्रत्येक बाजार समितीत होणार्‍या आवकेला प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी संपातील प्रतिनिधी माल आणणार्‍या शेतकर्‍यांना आवाहन करून संप यशस्वी करण्याचे आवाहन करताना दिसत होते. तर जिल्हा उपनिबंधकांकडून प्रत्येक बाजार समितीत होणार्‍या शेतमालाच्या आवकेचा अहवाल बाजार समिती सचिवांकडून मागावला जात होता.

शेतकर्‍यांनी समितीत माल आणावा, त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत होते. त्यामुळे काही बाजार समित्यात शेतमालाची आवक झाली होती. तर काही शेतकर्‍यांनी थेट शिवारात येणार्‍या व्यापार्‍यांना माल देण्याची तयारी दर्शवल्याचे चित्र जिल्ह्यात होते.

LEAVE A REPLY

*