लढा व्यापक करण्याचा निर्धार

शेतकरी समन्वय समितीच्या बैठकीत एकमुखी निर्णय

0
नाशिक | दि.८ देशदूत चमू- विविध मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सलग आठ दिवस रस्त्यावर उतरलेल्या बळीराजाने राज्य सरकारविरूध्दचा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार आज केला. येत्या सोमवारी (दि.१२) शासकीय कार्यालयांसमोर धरणे आंदोलन, १३ जूनला रास्ता रोको व रेल रोको आंदोलन आणि तिसर्‍या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद शहरांचे दूध, भाजीपाला व त्यांच्यासाठी जाणारे पाणी बंद करायचे, असे महत्वपूर्ण निर्णय शेतकरी समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात येऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्यावर शिक्कामोर्तब झाले.
आंदोलनाची व्यापकता व यश अधोरेखित करण्यासाठी भाजप वगळता उर्वरित राजकीय पक्षांचे सहकार्य घेण्याचा धोरणात्मक निर्णयही बैठकीत घेण्यात आला. एकीकडे मागण्यांचा मुद्दा धसास लावण्याचा निर्धार करताना समितीने नाशवंत शेतमाल व दुधाची संपातून मुक्तता करीत सर्वसामान्यांना दिलासा दिला.  शेतकरी संप महाराष्ट्र राज्य समन्वय समितीची बैठक आज नाशिक शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे झाली. तत्पूर्वी शेतकरी संपाच्या कोअर कमिटीची बैठक गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह येथे झाली.

त्यानंतर सुरु झालेल्या या बैठकीला शेतकरी संघटनेचे अध्वर्यू माधराव खंडेराव मोरे, रामचंद्र बापु पाटील, खा. राजू शेट्टी, आ. बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील, डॉ. अजित नवले,माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, आ. जयंत पाटील, आ. भाई जगताप, विश्‍वनाथ पाटील, सुशिलाताई नरोळे, अनिल घनवट, डॉ. गिरीधर पाटील, हंसराज वडघुले, राजु देसले यांच्यासह कोअर कमिटी सदस्यांसह राज्यातील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी संपाला पाठींबा देणार्‍या सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी व राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीतून शेतकरी संपाचा लढा देशपातळीवर देण्याचा निर्धार करतांना कोअर कमिटीने लढ्यात करावयाचा पुढील कार्यक्रम प्रस्ताव रुपात सभेत सभेत मांडला. त्यास सर्व नेत्यांनी पाठिंबा देत पुढील आंदोलनांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार आपल्या भाषणात व्यक्त केला. शेतकरी संपाच्या लढ्याला धार देण्याचे काम आजच्या बैठकीतून झाले. त्यामुळे येत्या तीन दिवसांत राज्य शासनाने संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोग शिफारशीची अंमलबजावणी यासह सर्व मागण्या मान्य न केल्यास राज्यात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता वाढली आहे.

शासनावर नांगर फिरणार-कडू
राज्यात शेतकर्‍यांचा संप होता. तो काही नेते, अभिनेते किंवा राजकीय पुढार्‍यांचा नव्हता. तरीही शासनाने दखल घेतली नाही. ज्या शेतकर्‍याला जमिनीत चार इंच नांगर कसा घुसवायचा याची माहिती असते त्याच शेतकर्‍याच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर शासनावर शेतकरी नांगर कसा फिरवतील. म्हणून शेतकर्‍यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. नाही तर राज्यभर आंदोलन कसे असते, याची झलक १० आणि १३ जूनला दिसेल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. पोलिसांच्या मदतीने मुख्यमंत्री शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडू पाहत आहात, पण शेतकर्‍यांवर कारवाई करण्याची तत्परता दाखवण्यापेक्षा गल्लीबोळात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात पोलिसांनी लक्ष द्यावे. शेतकर्‍यांवरचा अन्याय दूर करण्यासाठी सर्वजण जातीभेद, पक्षभेद विसरून एकत्र आलो आहोत, असेही कडू म्हणाले.

…तोपर्यंत मागे हटणार नाही-शेट्टी
शेतकर्‍यांचा सातबारा मुकाट्याने कोरा करा, आम्ही चर्चेचे दरवाजे बंद कधी केलेले नाहीत. ही समन्वय समिती चर्चा करायला तयार आहे. मात्र शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यत आम्ही मागे हटणार नाही. हा आमचा निर्धार आहे. १९८० साली शरद जोशी व माधवराव मोरे यांनी देशाला शेतकरी चळवळ कशी असते, त्याची धग कशी असते हे दाखवून दिले होते. त्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा करायची आहे. यासाठी तयार राहा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी आजच्या परिषदेत केले. शेतकरी संपात गुंड शिरल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार खा.शेट्टी यांनी घेतला. आम्ही आता गुंडांसारखे दिसायला लागलो का? असा सवाल त्यांनी केला.

बैठकीतील प्रमुख निर्णय 

  • शेतमाल व दुधाची संपातून मुक्तता
  • भाजप वगळून इतर राजकीय पक्षांचे सहकार्य घेणार
  • उद्यापासुन गावोगाव बैठक घेऊन आंदोलनाची जागृती
  • १२ जुनला धरणे आंदोलन.
  • १३ जुनला रास्ता व रेल्वे रोको आंदोलन
  • दुसर्‍या टप्प्यात राज्यातील मंत्र्यांना गावबंदी
  • मुंबई, पुणे, नागपुर व औरंगाबाद शहराचे दूध, भाजीपाला व पाणी बंद करणार

LEAVE A REPLY

*