बळीराजा उद्ध्वस्त होऊ नये : शरद पवार

बळीराजा उद्धवस्त होऊन चालणार नाही प्रकट मुलाखतीत शरद पवारांची चिंता

0

नाशिक | दि. २८ प्रतिनिधी- कृषी क्षेत्राबाबत राज्य आणि केंद्राचे ठोस धोरण नाही. शेतमालाला भाव नाही, अडचणीत शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळत नाही. अशा परिस्थिती शेतकरी हातबल झाला आहे. बळीराजा उद्ध्वस्त झाला तर देश उद्ध्वस्त होईल, अशी चिंता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दपूर्तीनिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्‍वास बँक आणि रेडिओ विश्‍वास या संस्थांच्या वतीने विश्‍वास लॉन्स येथे त्यांचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत पवार यांनी विविध प्रश्‍नांना त्यांच्या शैलीत उत्तरे दिली. ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र, सुधीर गाडगीळ व दत्ता बाळसराफ यांनी त्यांची मुलाखत घेतली.

पवार यानी यावेळी आपल्या राजकीय जीवनातील अनुभव, कृषी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील निर्णय आणि आठवणींना उजाळा दिला. व्यासपीठावर आमदार हेमंत टकले, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री विनायकदादा पाटील, माजी आमदार दिलीप बनकर, विश्‍वास ठाकूर, डॉ. कैलास कमोद आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकर्‍यांच्या समस्या सुटाव्यात म्हणून आपण केंद्र सरकार आणि राज्य शासनाशी कर्जमाफीबाबत अनेकदा बोललो आहोत. मात्र सरकार शेतकर्‍यांना मूठभर घटक समजत असून ग्राहकाभिमुख निर्णयाचे धोरण राबवत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या बाबतीत सरकार गंभीर नसल्याचे पवार यांनी मुलाखतीत सांगितले. राज्यात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर राजकारण सुरु आहे. शेतकर्‍यांचे हतबल होणे देशाला परवडणारे नाही.

त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी आपण स्वतः पंधरा दिवसांनी राज्यातील शेतकर्‍यांशी थेट बांधावर जावून बोलणार बोलणार आहोत, त्याची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून करणार आहे, असा संकल्प पवार यांनी बोलून दाखवला.
केंद्रीय कृषिमंत्री असताना आपण यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या पाहून गहिवरलो होतो. आपल्या काळात आपण कर्जमुक्तीचा निर्णय देशातील शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतल्याचे समर्थन त्यांनी केले. तेव्हा ७३ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती केली.

त्यामूळे देशातील ६० टक्के शेतकर्‍यांना त्याचा लाभ झाला. देशातील अन्नधान्य, भाजीपाला, दूध, फळे आदी उत्पन्न प्रचंड वाढले आणि जगात देशाच्या शेतमाल उत्पादनाचा आलेख सतत उंचावत राहिला, असे पवार यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी उशिरा उपरती झाल्याचा टोमणा मारत पवार यांनी शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेवरही टीका केली. शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागणीही पवार यांनी केली.
महाविद्यालयीन जीवनातच देशपातळीवरील राजकारण करण्याचा विचार केला होता, ही आठवण सांगताना त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणांचा आपल्यावर प्रभाव होता, हे नमूद केले.चव्हाण यांच्याकडून राज्य कसे असावे आणि सामान्यजनांना कसे उभे करावे, याची प्रेरणा घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात चारवेळा मुख्यमंत्री होऊनही देशात पंतप्रधानपदावर जाण्याची संधी हुकल्याची खंत व्यक्त करताना शरद पवारांनी आपल्याला संसदेत संमर्थनीय लोकप्रतिनिधींचे संख्याबळ असलेली फळी उभी करता आली नसल्याचे सांगितले.

कॉंगे्रसने वास्तवतेचे भान गमावले तेव्हाच आपण या पक्षापासून दूर गेल्याचे पवार म्हणाले. सध्या देशाला विरोधी पक्ष म्हणून असू शकेल, असा एकमेव अनुभवी आणि जुना पक्ष कॉंगे्रस आहे, या पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे जपण्याची गरज असल्याचा सल्ला पवार यांनी सोनिया गांधी यांना मुलाखतीतून दिला. महत्वाचे निर्णय घेताना यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्या विचारांची आठवण कायम ठेवली, असे पवार यांनी नमूद केले. राजकीय कार्यकर्त्यांनी सत्ता, संपती, दागदागिने यांचे प्रदर्शन सार्वजनिक जीवनात करून नये, असा सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना दिला.
देशात सध्या सर्वच सत्ता एका पक्षाच्या हाती आली आहे. सध्या लोकांपुढे पर्याय उपलब्ध नाहीत. ही स्थिती धोक्याची ठरू शकते. जनतेसमोर पर्याय हवेत. सध्या कॉंग्रेसची स्थिती जेमतेम असली तरी १८ हून अधिक प्रादेशिक पक्ष आपापल्या भागात उत्तम काम करत आहेत. ते एकत्र आल्यास एक पर्याय उपलब्ध होवू शकतो, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.
संस्था उत्तम प्रकारे चालवण्यासाठी काय करावे, हा प्रश्‍न विचारल्यानंतर प्रत्येक संस्थेत लोकसहभाग महत्वाचा आहे. आज राज्यात रयत, शिवाजी अशा अनेक नामांकित संस्था सुरू आहेत. या संस्थांत राजकीय हस्तक्षेप नको. चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. लोकभावनांचे जतन, गैरविश्‍वास निर्माण होणार नाही याची खात्री अन् धोरणात्मक टीका करण्याचा १०० टक्के अधिकार सर्वांना असावा. त्यातून संस्था जतन कराव्यात, असे पवार यांनी सांगितले.

पुस्तकांच्या आवडीविषयी पवारांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी कला, साहित्य, नाटक याची समाजाला गरज असल्याचे संागितले. भेटस्वरूपात पुस्तक देवून वाचक चळवळ बळकट करण्याची गरज आहे. मी आजही मुंबई, इंग्लड कुठेही गेल्यास पुस्तक चाळतो. त्यांचा आढावा घेतो. त्यातील चांगली पुस्तके वाचतो, असे त्यांनी सांगितले. साहित्यात कविता हा प्रकार डोक्यावरून जात असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली.

आर्थिक, शिक्षण, आरोग्य, प्रवास वर्णन हे साहित्यप्रकार विशेष आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध भेटीतून ५० हजारांहून अधिक पुस्तक जमवली असून त्यातून वाचनप्रेरणा वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शारीरिक विश्रांतीच्या प्रश्‍नावर बोलतांना पवार म्हणाले की, मी लोकांमध्ये वावरणारा माणूस आहे. मी विश्रांती केली तर माझा कार्यकर्ता कमकुवत होईल. त्याला मदत करणे, त्याला निवडून आणण्यासाठी धडपड करणे ही गरज आहे.

गांधीजी म्हणतात खेडयाकडे चला तर डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहराकडे चला! यातील कोणते मत महत्वाचे वाटते या प्रश्‍नावर पवार यांनी समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले की दोघांचीही मते महत्वाची वाटतात. जातीयता संपवायची असेल तर शहरात जाण्याशिवाय पर्याय नाही आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचे असेल तर ग्रामीण भागात जाणे महत्वाचे आहे.

दोघांचाही विचार विकासाचा असाच होता. भाजपचे कॉंग्रेसीकरण होते आहे का? या प्रश्‍नावर आपली भूमिका मांडताना पवार म्हणाले की, कॉंग्रेस तयार होण्यासाठी ५० वर्षे जावी लागली. परंतु दोन वर्षांत गणिते बिघडली, असे सांगताना एकूणच राजकीय अस्थिरतेवर त्यांनी जास्त बोलणे टाळले. याप्रसंगी पवार यांनी अनेक मोलाचे सल्ले मुलाखतीतून दिले. कोणतीही ज्ञानी व्यक्ती असेल तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा. त्याचे म्हणणे एकूण घ्यावे. जाणकारांकडून शिकण्यासारखे खूप आहे. ते शिकत रहावे. त्यातून आपण प्रगल्भ होतो.

तडजोडी करताना त्रास निश्‍चित होतो. परंतु राजकारणात तडजोडी महत्वाच्या असतात, असे पवार यांनी सांगितले. सध्याच्या असहिष्णू वातावरणात तरूणांच्या भूमिकेविषयी बोलताना पवार म्हणाले की, प्रखर राष्ट्रभक्तीव्दारे तरूणांना आकर्षित करण्याचे काम केले जात आहे. त्याचे परिणाम आज ना उद्या होतील. लोकांना कोणत्या विचारांची गरज आहे. कोणत्या धोरणांची गरज आहे याचा विचार प्रथम राजकीय पक्षंानी करावा. तरच परिस्थिती बदलेल. जनतेत काम करतांना लोकांचे बनून राहा, दुसर्‍यांच्या अनुभवाचा गांभीर्याने विचार करा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
त्यांनी दिले वर्सेस ऑफ थॉटफ
मला मोमेंटोऐवजी पुस्तके द्यावीत, अशा सूचना मी सर्वांनाच केल्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसला. परंतु पुण्यात एका कार्यक्रमात मला दोन जाडजुड पुस्तके भेट देण्यात आली. घरी गेल्यावर उघडून पाहिले असता ती पुस्तके म्हणजे गोळवळकर गुरूजींची ङ्गवर्सेस ऑफ थॉटफ ही होती. त्यामुळे पुस्तक देतांना कोणती द्यावीत याचाही विचार आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

तुला घालवल्याशिवाय जाणार नाही
तोंडाचा कॅन्सर झाल्यानंतर मला एका युवा डॉक्टरने सल्ला दिला. साहेब, तुमचा आजार मोठा आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सहा महिने जगाल. म्हणून तुमचे काही असेल ते आटोपून टाका, असे त्याने सांगितले. यावर मी त्याला त्याचे वय विचारले. त्याने ते २८ वर्षे असे सांगताच मी त्याला म्हणालो की, तू निश्‍चिंत राहा. मी तुला घालवल्याशिवाय जाणार नाही. ही गोष्ट २००४ सालची आहे. आज २०१७ सुरू आहे. हा किस्सा सांगितल्यानंतर श्रेात्यांनी पवारांना हसून टाळयांची मनोसोक्त दाद दिली.

५ हजार दुर्मिळ पेन
पेन जमवण्याच्या छंदाविषयी गाडगीळ यांनी पवार यांना प्रश्‍न विचारताच त्यांनी आपल्याजवळ ५ हजारांहून अधिक पेन असल्याचे सांगितले. यात बोरू, टाक, विविध नामी कंपन्यांचे पेन, लखनौ, कोलकाता येथील दुर्मिळ पेन आपल्या संग्रही आहेत. या पेनांचे प्रदर्शन आपण भरवत असून दिवसेंदिवस हा संग्रह वाढत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

*