पशुधन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची वणवण

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण पाणी व चाराटंचाई निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना आपले पशुधन वाचविण्यासाठी मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या आवर्तनातून अनेक गावांचे गावतळे न भरले गेल्यामुळे महिलांसह बालकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. गेल्या हंगामामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक गावांमध्ये भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. थेंबथेंब पाण्याच्या शोधासाठी मैलोनमैल शेतकर्‍यांना भटकंती करावी लागत आहे. दुष्काळाची झळ बसलेल्या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना जगायचे कसे हा मोठा प्रश्‍न पडला आहे. त्याचबरोबर शेती व्यवसायाला पूरक व्यावसाय असणार्‍या पशुपलन व्यवसायालाही पाणीटंचाईमुळे घरघर लागली आहे.

तालुक्यातील एकलहरे, उक्कलगाव सह प्रवरापट्टा तसेच गोदापट्टा आदींसह अन्य भाग भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्याकडील गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांना मुबलक चारा मिळत नसल्याने पशुधनाचे करायचे काय असा प्रश्‍न शेतकरी बांधवापुढे पडला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून सततच्या पडणार्‍या भीषण दुष्काळामुळे तसेच बेसुमार घेतलेल्या कूपनलिकेमुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट आली आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील ओढेनाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्याची मोठी समस्या झाली आहे.

या भागातील शेतकर्‍यांपुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. विशेषतः पशुधन वाचविण्यासाठी या शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जनावराना हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकीत राजकिय नेते दंग झाल्यामुळे दुष्काळापुढे हतबल झालेल्या सामान्यांकडे कोणाचेच लक्ष नाही. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत चालल्याने अनेकजण स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी तरुण मुले हे उदरनिर्वाहासाठी शहराकडे स्थलांतरीत झाले आहेत. ही ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. दुष्काळात होरपळून जात असलेल्या शेतकरी बंधूंकडे शासनाचा कानाडोळा झाला आहे. त्यातच लोकसभेचे निमित्त करून अधिकारीवर्गही सैराट झाला आहे.

अचानक बंद झालेल्या भंडारदरा धरणातील आवर्तनातून प्रत्येक गावातील गावतळे व पाणीपुरवठा योजनेचे तलाव पूर्ण क्षमतेने भरले गेले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. गावतळ्याबरोबर एन. बी. कॅनॉलवरील खैरी निमगाव, माळवाडगाव, माळेवाडी आदी गावांबरोबरच पढेगाव, मातापूर आदी गावांतील शेतकर्‍यांनी सात नंबरचे फॉर्म भरूनदेखील त्यांना पाणी न मिळाल्याने शेतातील उभी पिके व चारा पिकेही जळून गेली आहेत. त्यातच श्रीरामपूर तालुक्यातील चारही मंडल दुष्काळग्रस्त जाहीर करा, असे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश असतानाही राज्य शासनाने मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

*