कुकाण्यात आमदारांच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न

0

सात जण पोलिसांच्या ताब्यात, काही काळ तणाव, दोन तास आंदोलन

कुकाणा (वार्ताहर) – राज्यव्यापी शेतकरी संपादरम्यान काल बुधवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कुकाणा येथील संपर्क कार्यालयाला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कुलूप लावण्याचा प्रयत्न झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
दुपारी 12 वाजेच्या दरम्यान शेतकरी संघटना कार्यकर्ते व शेतकरी यांना कार्यालयास टाळे लावण्यास आमदार मुरकुटे यांचे कार्यकर्ते व पोलीस कर्मचार्‍यांनी विरोध केला. हे आंदोलन दोन वाजेपर्यंत चालले. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दोन तासांच्या काळात आंदोलकांनी आमदार मुरकुटे यांच्या कार्यलयाच्या दारात ठिय्या मांडून व झोपून आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कुकाण्यात सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन वाजेच्या दरम्यान आंदोलक आक्रमक झाले.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खराडे, अजित मंडलिक, पांडुरंग होंडे, त्रिंबक भदगले, विश्‍वास जावळे, संभाजी माळवदे, मच्छिंद्र आर्ले आदी मुरकुटे यांच्या संपर्क कार्यलयाचे शटर खाली घेण्याचा प्रयत्न करत असताना नेवासा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व आंदोलक पांगून कार्यालय पुन्हा सुरळीत चालू करण्यात आले.
यावेळी अटक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनात बसताना सरकारविरोधी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांना नेवासा पोलीस ठाण्यात नेऊन काही वेळाने सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस खात्याकडून देण्यात आली. सातव्या दिवशी लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांच्या घराला व संपर्क कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिवस म्हणून गाजला.

शेतकरी संघटना व शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली दार बंद आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे नेवासा-शेवगाव राजमार्गालगत असलेल्या कुकाण्यातील या संपर्क कार्यलयाच्या सभोवताली शेतकरी व बघ्यांनी गर्दी केली होती.

आमदार मुरकुटेंना शेतकर्‍यांसाठी वेळ मिळत नाही का – जावळे

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर भांडून मी शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्याचे सांगून मते मिळवणारे आमदार बाळासाहेब मुरुकुटे शेतकरी संपात का सामील होत नाहीत, शेतकरी हक्कासाठी लढत असताना आमदार कुठे गुंतले आहेत? त्यांना शेतकर्‍यांकडे येण्यासाठी वेळ मिळत नाही का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विश्‍वास जावळे यांनी केला.

LEAVE A REPLY

*