वांबोरी खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांच्या शेतीमालाला कोलदांडा : शेतीमाल ओतून निषेध

0
उंबरे (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे शासनाने शेतकर्‍यांच्या मागणीवरून हमीभाव केंद्र सुरू केले. मात्र, येथील आडमुठ्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांचे सोयाबीन, उडीद, मूग हा शेतमाल खोट्या सबबी दाखवून नाकारला आहे. पर्यायाने हा माल परत नेण्यासाठी शेतकर्‍यांकडे दमडीही नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकर्‍यांना संबंधित अधिकारी दमदाटी करीत असल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी हमी भाव केंद्रावर विक्रीसाठी आणलेला माल खाली ओतून विक्री केंद्रावर चाललेल्या गैरकारभाराचा निषेध करीत आंदोलन केले.
शेतमाल घेऊन आलेल्या शेतकर्‍यांना या केंद्रावर मोठा आर्थिक कोलदांडा बसल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, हे केंद्र म्हणजे शेतकर्‍यांना डोकेदुखी बनले असून शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात केंद्रावर फसवणूक होत आहे. एक महिन्यापासून सांभाळून ठेवलेला शेतीमाल नाकारून तो बाजार समितीतील खासगी व्यापार्‍याला विकण्यास भाग पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.
काबाडकष्ट करून स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त जीव लावून आपल्या शेतात घेतलेल्या पिकांच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी केली होती. गेल्या एक महिन्यापासून खरेदी-विक्री संघाच्या साईटवर ऑनलाईन नोंदणी करून मंगळवारी सकाळपासून वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत आपले मूग, सोयाबीन, उडीद हा शेतीमाल येथील हमी केंद्रावर विक्रीसाठी आणला होता.
मात्र, या शेतकर्‍यांना शेतीमाल खरेदी करणार्‍या अधिकार्‍यांच्या उर्मटपणाचा कटू अनुभव आला. संबंधित अधिकारी आणि काही खासगी व्यापार्‍यांची आर्थिक साखळी असल्याचा आरोप संतप्त शेतकर्‍यांनी केला आहे.
राहुरी तालुक्यातील 40 शेतकर्‍यांना दूरध्वनीवरून संपर्क करून आपला शेतीमाल घेऊन केंद्रावर बोलाविण्यात आले.
त्यामुळे मिळेल त्या वाहनाने शेतकरी वांबोरीच्या केंद्रावर शेतीमाल घेऊन हजर झाले. परंतु त्यापैकी फक्त बोटावर मोजण्याइतक्या शेतकर्‍यांचाच माल खरेदी केला व बाकी शेतकर्‍यांचा शेतीमाल दर्जा आणि आकार यासह काहीतरी थातूरमातूर कारणे सांगून नाकारण्यात आला.
निवड केलेल्या शेतीमालाची ग्रेडिंग केली जाते. यावर शेतकर्‍यांनी आवाज उठविला. आमच्या मालाची अगोदर ग्रेडिंग व सफाई करण्याची मागणी केली. त्यावर संबंधित अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना तुम्ही ग्रेडिंग करून परत ऑनलाईन नोंदणी करून दुसर्‍या खाते उतार्‍यावर पीक नोंद करून परत विक्रीसाठी आणावा, असा उपरोधिक सल्ला या अधिकार्‍यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिल्यानंतर तुम्ही कोणालाही सांगा, आम्हाला फरक पडत नाही, असे सुनावल्यामुळे नंतर मात्र, शेतकर्‍यांना पुन्हा माघारी फिरावे लागले.
त्यामुळे शेतीमाल घेऊन केंद्रावर आलेल्या शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला. या केंद्रावर फसवणूक करून शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने या केंद्राच्या सर्व कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

यंदा ऐन पिकांच्या सोंगणीच्या काळात संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चालू पावसात चिखलातून शेतातील पीक बाहेर काढले. मोठ्या कष्टाने सुकविले व तीन हजार रुपये भाडे देऊन विक्रीसाठी आणले. मात्र, आणलेला माल नाकारल्यामुळे हतबल झालो आहे.
राजाबापू भीमाजी वाबळे
(वाबळेवाडी, ता. राहुरी)

मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्यानंतर कपाशी व सोयाबीनची वाट लागली. त्यातून कशीबशी जगविलेली पिके बाजारात आणली. त्यातून दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आता व्यापार्‍यांनी शेतीमाल नाकारल्याने परतीसाठी भाडेही द्यायला पैसे राहिले नाही. बाजार समितीच्या दारात सकाळपासून बिगर अन्नपाण्यावाचून नंबरासाठी आलो होतो. मात्र, आता हिरमोड झाला आहे.
भाऊराव ढोकणे
(प्रगतिशील शेतकरी, उंबरे)

LEAVE A REPLY

*