पारनेर : शेतकरी आंदोलनाने तालुका प्रशासन हादरले

0

कान्हूर पठार चौकात 3 तास रस्ता रोको : आक्रमक पावित्र्याने अधिकारी आंदोलनस्थळी

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील कान्हूर पठार येथे विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने शेतकर्‍यांसंबंधीच्या विविध मागण्या व महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात तालुक्यातील कान्हुर पठार येथे 3 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीपर्यंत रस्ता रोको करण्याचा आक्रमक पावित्रा आंदोलकांनी घेतल्याने तालुका प्रशासन हादरले. काही तासांत विविधि विभागाचे प्रशासकीय अधिकारी कान्हूरमध्ये दाखल होवून आश्‍वासने दिली. तर नायब तहसीलदार दत्तात्रेय बाहुले यांनी लालफितीत अडकलेले रेशनकार्ड तात्काळ वाटप केली.
गुरूवारी (दि.23) रोजी सकाळी 8 वाजता कान्हुर पठार येथील पारनेरकडे जाणार्‍या चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी शाळकरी मुलींनी शेतकर्‍यांच्या व्याथांचे वर्णन भाषणातून मांडले. अनुजा बाळासाहेब शेळके या विद्यार्थीनीने कवितेतून शेतकर्‍यांरी समस्या मांडल्या.
यावेळी वीज मंडळाचा ढिसाळ कारभार सुधारावा व शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक थांबावी तसेच गावठाणमधील सिंगल फेज लाईट पूर्ववत करावी. टाकळी ढोकेश्वर ते पारनेर रस्त्याच्या निकृष्ट कामांची उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई करणे, सर्वसामान्यांना आधारकार्ड व रेशनकार्डसाठी होणारा त्रास थांबवणे, कांदा आयात धोरण रद्द करणे, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करावी व कान्हूर पठार वरून जाणार्‍या सर्व एस.टी. बसेस पूर्ववत व वेळेवर चालू करणे अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे, पारनेर सैनिक बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे, माजी सरपंच गोकुळ काकडे, सरपंच मंजुळा ठुबे, उपसरपंच शिवाजी शेळके आदींनी सर्व प्रश्‍न तातडीने मार्गी लावावे, अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
आंदोलनाची आक्रमकता पाहताच आधीपासून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, पारनेरचे नायब तहसीलदार दत्तात्रेय बाहुले, वीज मंडळाचे उपअभियंता मंगेश प्रजापती, एसटी आगाराचे पारनेर आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांच्यासह तहसील कार्यालयाचे कर्मचारी व इतर अधिकार्‍यांनी उपस्थित राहून विविध कामे मार्गी लावण्याचे आश्‍वासने दिली.
आंदोलनस्थळी ग्रा.पं.सदस्य किरण ठुबे, सागर व्यवहारे, नियाज इनामदार, बबन घुमटकर, संतोष ठुबे, ज्ञानेश्‍वर ठुबे, नामदेव ठुबे, मंगेश खोसे, गारगुंडीचे माजी सरपंच बाळकृष्ण झावरे, अंकुश झावरे आदी पिंपळगाव रोठा, वडगाव दर्या, विरोली, पिंपरी पठारे, गारगुंडी, किन्ही, करंडी, अक्कलवाडी, वेसदरे आदी गावांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आश्‍वासनाची पूर्तता न झाल्यास यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

LEAVE A REPLY

*