कर्जमाफीच्या स्वरूपाबाबत शेतकर्‍यांत तर्कवितर्क

0

गावकट्टा, लग्नसमारंभ आदी ठिकाणी रंगले चर्चेचे फड

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शेतकरी आंदोलनाच्या दबावाने सरकारने तत्त्वतः सरसकट कर्ज माफीची घोषणा केली असली तरी अद्याप कर्ज माफीचे निकष जाहीर केले नसल्याने कर्ज माफीचे नेमके स्वरूप कसे राहील या बाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असून कट्ट्यावर, चहाच्या टपरीवर, लग्नसमारंभात व इतर ठिकाणी चांगलेच चर्चेचे फड रंगताना दिसत आहेत.

राज्यातला शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून संपावर गेला होता. स्वातंत्र्यानंतर शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच व ऐतिहासिक घटना होती.अहमदनगार जिल्ह्यातील पुणतांबा या छोट्याशा गावाने संपावर जाण्याची हाक प्रथम दिली होती.

बघता बघता या संपाचा वणवा राज्यभर पेटला आणि सरकारला हादरे बसू लागले.सुरुवातीला छोट्या वाटणार्‍या या आंदोलनाला दलालांमार्फत मोडण्याचा प्रयत्नही केला गेला. अपरिपक्व दलाल नेत्यांनी शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा डाव उघड झाल्याने राज्यातील तज्ज्ञ शेतकरी नेत्यांनी आंदोलनात उडी घेतली व अधिक जोमाने आंदोलनाची व्याप्ती वाढवत आंदोलन पुढे चालू ठेवले.

दहा दिवस सुरु आसलेल्या या प्रखर आंदोलनामुळे मोठ्या शहरांची चांगलीच कोंडी झाल्याने सरकारला नरमाईची भूमिका घेत आंदोलनाच्या सुकाणू समितीच्या शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी पाचारण करावेच लागले. शेतकरी नेते आणि मंत्रिगटाची रविवारी संपाच्या अकराव्या दिवशी बैठक पार पडली. शेतकर्‍यांच्या सातबारा कोरा करण्याच्या मागणीला सरकार कडून सरसकट कर्जमाफीला तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

दूध दरवाढ व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी शेतकरी नेते व मंत्रिगट केंद्र सरकारशी चर्चा करण्याचेही ठरल्याने शेतकरी संप तूर्त स्थगित करण्यात आला आहे. तत्त्वतः सरसकट कर्जमाफीची घोषणा झाली आसली तरी त्या बाबतचे निकष अद्याप जाहीर झाले नसल्याने ग्रामीण भागात चर्चेचे गुर्‍हाळ रंगत आहेत. संपूर्ण कर्ज माफीच्या अपेक्षेने शेतकर्‍याचे चेहरे खुलले आहेत.

प्रत्येकजण वेगवेगळे तर्कवितर्क करुन मत मांडीत आहे. शेतकर्‍यांनी सेवा संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था, खाजगी पतपुरवठा करणार्‍या संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शेती कर्ज घेतलेले आहे. सेवा संस्थेकडून एकाच क्षेत्रावर दुबार, तिबार कर्ज घेतलेले शेतकरीही आहेत. राजकीय संबधामुळे असे कर्ज वितरण झाले आसल्याचे सांगितले जाते. तर काही नियमित कर्ज भरणारे शेतकरीही आहेत.

प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरण्याचे त्यांना काय मिळणार या बाबतचे सर्व निकष अद्याप सरकारने जाहीर केले नसल्याने गावातील कट्ट्यावर, चहाच्या ठेल्यावर, लग्न समारंभात व इतर ठिकाणी चर्चेचे फड चांगलेच रंगात आले आहेत. लवकरच सर्व निकष जाहीर होतीलच मात्र तोपर्यत शेतकरी सातबारा कोरा होण्याच्या आपेक्षेने सुखावला आहे हे निश्चित!

LEAVE A REPLY

*