शेतकरी वडिलांना दिला दिव्यांग मुलीने आधार

0
बेलपिंपळगाव (वार्ताहर)- कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करतात तर अनेकांचे प्रपंच मोडकळीस आले आहेत. अशा परिस्थितीत बेलपिंपळगाव येथील शेतकरी मुमताज सय्यद हे देखील या परिस्थितीला सामोरे जात असताना त्यांच्या 19 वर्षाच्या आईशा या दिव्यांग (अपंग) मुलीने आपल्या वडिलांच्या प्रपंचाचा गाडा ओढण्याचे ठरवले आणि कुटुंबाला आधार देण्याच्या हेतूने ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता करता गावात बेकरी व्यवसायही करीत आहे.
मुमताज सय्यद यांची घरची परिस्थिती हलाखीची असून कुटुंबामध्ये सहा सदस्य आहेत. त्या सर्वांचे पालनपोषण एकट्या मुमताज यांना करावे लागे. त्यांनी घरखर्च चालवण्यासाठी गावामध्ये अंडी, पाव विकण्याचा गाडा चालू केला; पण वाढत्या महागाईमुळे घरखर्च भागत नसल्याने त्यांचे दुःख त्यांच्या मुलीला बघवले नाही. त्यामुळे आईशाने समाजाची पर्वा न करता व्यवसायाला हिंमतीने सुरूवात केली. विशेष म्हणजे आईशा ही दिव्यांग आहे.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता करता आईशा वडिलांसोबत जिद्दीने काम करत आहे. एवढेच नव्हे तर 8 बाय 8 च्या दुकानात ग्राहक सांभाळता सांभाळता जिद्दी आईशा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नियमितपणे करते. क्लास वन अधिकारी बनून वडिलांचे स्वप्न साकारण्याची ती तयारी करत आहे. खचून न जाता हिमतीने लढण्याचा निर्णय या अपंग मुलीने घेतल्याने तिचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*