Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर तालुक्यातील चंद्रपूर गावात पोळा झालाच नाही! हे आहे कारण…

Share

सिन्नर । प्रतिनिधी 

पोळ्याच्या सणासाठी बैलांना धुण्यासाठी बंधाऱ्यात उतरलेल्या आदीवासी शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज (दि.30) सकाळी 10 वाजेच्या  दरम्यान तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथे घडली. त्यामुळे ऐन बैलपोळ्याच्या उत्सवावर विरजण पडले. ग्रामस्था शोकसागरात बुडाल्याने आज गावात पोळयाचा उत्सव साजरा झाला नाही. अनेक घरात चूलदेखील पेटली नाही.

चंद्रपूर गावाच्या जवळच असणाऱ्या बंधाऱ्या जवळच बंडू पुंजा गवारे (47) आपल्या कुटुंबियांसह राहतात. आपल्याकडील दोन बैल बंधाऱ्यात धुण्यासाठी ते घेऊन गेले होते. पाण्यात उतरताना बैलाचा धक्का लागल्याने ते पाण्यात फेकले गेले आणि त्यातच त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मदतीसाठी धावून गेले.

तहसीलदार राहुल कोताडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रास माहिती देत जीवरक्षक पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार नाशिकचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

जीवरक्षक तुपे यांनी पाण्यात उतरून मृतदेह शोधण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, मदतीसाठी आवश्यक साधने नसल्याने त्यात अडथळा येत होता. सायंकाळी 6.30 च्या दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाकडून सागर गडाख यांच्या नेतृत्वाखालील दुसरे पथक आले.

मात्र, त्यापूर्वीच संदीप वाघ, मच्छिंद्र बोडके, तुपे यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी 6.45 वाजेच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. मयत गवारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून ऐन पोळ्याच्या दिवशी काळाने गवारे यांच्यावर घाला घातल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!