Type to search

ब्लॉग सार्वमत

Blog: नको दिलासा..हवा हमी भाव…

Share

सत्तेत येण्यासाठी ‘शेती’ आणि ‘शेतकरी’ हे हुकमी पत्ते असल्याची जाणीव आता सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. निवडणुकांच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांकडून मतांची ‘शेती’ फुलविण्याचे प्रयत्न होत आहेत. या नादात शेतकर्‍यांना आश्‍वासनांची फुले उधळून त्यांना आकर्षित करून सत्ताही हस्तगत केल्या जात आहेत. पण पुढे शेतकर्‍यांचे रडगाणे कायमच राहिले आहे.  भारत कृषिप्रधान देश. त्यामुळे सहाजिकच अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे शेती आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वातंत्र्यानंतर शेतकर्‍यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. पण खरचं शेतकर्‍यांच्या स्थितीत फरक पडलाय का? शेतकर्‍यांच्या मूळ समस्या काय आहेत याकडे दुर्लक्ष झालय. कर्जमाफी, शेतकर्‍यांना किसान सन्मान सिद्धी योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. यातून काहीसा शेतकर्‍यांना आधार मिळेलही.. पण पुढे काय?

भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. पण शेतीचे अर्थशास्त्र कुणी समजून घ्यायला तयार नाही. शेतमालाला सातत्याने मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचे जे आर्थिक खच्चीकरण झाले आहे त्यातून त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. घामाचे दाम मिळत नसल्याने आज शेतकर्‍यांबरोबरच देशाचाही तोटा होत आहे. उद्योजक त्याने उत्पादित केलेल्या मालाचा भाव ठरवितो. पण शेतमालाबाबत तसे होत नाही. जो न्याय उद्योगांमधील मालाला दिला जातोय तोच न्याय शेतीमालाला दिला जात नाही हे दुर्दैव आहे. शेतकरी जेव्हा एक दाणा पेरतो, तेव्हा त्याचे हजार दाणे तयार होतात. त्याला कोणाच्या मदतीची, अनुदानाची गरज नाही. तर त्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळणे गरजेचे आहे. राज्यकर्त्यांचा लबाडपणा आणि पुढार्‍यांची भांडवली पुंजी यात शेतकरी कैचीत सापडला आहे. वीज नाही, पाणी नाही.

तंत्रज्ञान नाही. कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकला. निर्यातबंदी केली…या प्रकाराने शेतकरी कर्जात गाडला गेला आहे. विविध बंधने लादून त्याला आपण आणखी खड्ड्यात घातले आहे. आणि त्यातून नैराश्य आलेला शेतकरी मरणाला कवटाळतो. शेतकरी आत्महत्या ही सामाजिक समस्या आहे. आत्महत्या करण्याचा एक क्षण असतो. त्या शेवटच्या क्षणी कोणी, जर पाठीवर हात फिरवला, तर तो ती करणार नाही. अशा शेवटच्या क्षणी हात फिरवता येण्यासाठीची व्यवस्था आपण उभी करू शकलो नाही, हे आपले अपयश आहे.

आज शेती जुगार बनलीय. पाऊस चांगला झाला तर ठिक नाहीतर नेहमीचे दुःख कायमच वाट्याला. मागील दहा वर्षात बियाणे, रासायनिक खते, किटनाशके, कृषी अवजारांच्या किंमतीत चार ते आठ पटीने वाढ झाली. शेती करताना आता बियाणांसाठी जेवढा खर्च केला तेवढा खर्च सुद्धा त्या मालातून निघेल का याची कुठलीच शाश्‍वती नाही. त्याउलट शेतमालाला किती भाव मिळतोय? कित्येकदा मातीमोल भाव मिळत असल्याने शेतीमाल शेतातच टाकून द्यावा लागतो. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यातील पाणी आज ही कायम आहे.

शेतीत आज संधी भरपूर आहे. पण शेतीबाबत अनास्था वाढत चाललीय. शेतीत काही पिकत नसल्याचा समज झाल्याने नवी पिढी शेतीपासूनच दुरावली आहे. मुलीही शेतकरी मुलांना पसंत करीत नाहीत. नव्या पिढीची आलेल्या संकटाला लढण्याची तयारी नाही. तरूण, तरूणी शेतीऐवजी नोकरीकडे आकर्षित होऊ लागलेत. पण नोकर्‍या आहेत तरी किती? उद्योग करायचा म्हटलेतर त्यासाठी भांडवल नाही, नी मानसिकता…हे कुठेतरी थांबविण्याची गरज आहे.

शेतकरी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. पुणतांब्यात शेतकर्‍यांनी आंदोलन केले. शेतकर्‍यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन छेडले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही बेमुदत उपोषण केले. मुंबई आणि दिल्लीतरी शेतकर्‍यांची आंदोलने झाली. या सार्‍या पार्श्वभूमीवर शेतकरी राजा आता केंद्रस्थानी आल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने सकारात्मक पावले उचलण्यास सुरूवातही केली. त्याच पार्श्‍वभूमीवर आता सरकार सर्वच शेतकर्‍यांना सहा हजार रुपये सन्मान निधी देणार आहे. याने शेतकर्‍यांचे भले होईल का तर याचे उत्तर हे नकारात्मक आहे. ज्या योजनेतून भविष्यासाठी हाती काहीच लागणार नाही अशी योजना शेतकर्‍यांना नकोय.

शेती भारताचे, महाराष्ट्राचे ‘बलस्थान’ आहे. या देशात सर्व प्रकारची पिके घेतली जातात. पण आपल्या आयात-निर्यात धोरणाचा फटका शेतकर्‍यांना बसतोय. आपला शेतकरी प्रयोगशील, जिद्दी आहे. शेतात राबराब राबण्याची त्याची तयारी आहे. कृषी शास्त्रज्ञही मेहनती आहेत. जे जगाला पाहिजे ते पिकविण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सरकारी तिजोरीवर पोसण्याऐवजी त्याला लढण्यासाठी प्रोत्साहन दिले, शेतीला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव दिला. आयात-निर्यात धोरणाची योग्य आखणी केली आणि राज्यकर्त्यांनी शेती आणि शेतकर्‍यांप्रती असलेला दृष्टीकोन सकारात्मक ठेवलातर या देशातील बळीराजाला वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

-बद्रीनारायण वढणे
9623445049

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!