शेतकरी संपात शेतमाल, दूधगाड्यांचे नुकसान

0
नाशिक | दि. ३१ प्रतिनिधी- शेतकर्‍यांनी पुकारलेल्या ऐतिहासिक संपात पहिल्याच दिवशी जिल्ह्यातून इतर राज्यांत तसेच बाजारपेठांमध्ये जाणारा भाजीपाला, दूध, अंडी तसेच कृषीपूरक मालाची वाहतूक करणार्‍या वाहनांना लक्ष्य व अडवून त्यांची तोडफोड करण्याच्या घटना येवला व निफाड तालुक्यांत घडल्या.
काही ठिकाणी शेतमाल रस्त्यावर टाकून संपाकडे दुर्लक्ष करणार्‍या शेतकरी व व्यापार्‍यांना संपकर्‍यांनी दणका दिला. बाजार समित्यांमध्ये कोणतीही हिंसक घटना घडू नये म्हणून तेथे पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील शेतकर्‍यांनी मध्यरात्रीपासून सुरु केलेल्या संपाचे दृष्य परिणाम आज पहाटेपासून नाशिक जिल्ह्यात दिसायला सुरूवात झाली होती.

दूधाची विक्री, भाजीपाला पुरवठा याबरोबरच फळे आणि फळभाज्यांची बाजार समित्यांमध्ये होणारी आवक पूर्णपणे ठप्प झाली होती. नाशिक, निफाड, मनमाड, येवला, चांदवड, वणी, दिंडोरी, लासलगाव, सायखेडा, उमराणे, अंदरसूल, नांदूरशिंगोटे या बाजार समित्या व उपबाजार आवारांमध्ये आज शेतमालाची आवकच झाली नाही. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. काही शेतकर्‍यांनी शेतमाल आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांच्या वाहनांना बाजार समित्यांपासून काही अंतरावरच अडवण्याचे प्रयत्न जिल्ह्यातील विविध मार्गावर संपकर्‍यांकडून करण्यात येत होते.दूध, टोमॅटो, कांदा, आंबा, भाजीपाला आदी शेतमाल रस्त्यांवर टाकून आंदोलन करण्याच्या घटना नैताळे, पालखेड, दिंडोरी, नांदूरशिंगोटे परिसरात घडल्या. मनमाडला रस्त्यांवर दुधाचे वाहने अडवून दूध परराज्यात घेऊन जाण्याचे प्रयत्न रोखण्यात आले. वणी येथे राजहंस दूध संघाचे सुमारे १३ टॅकर अडवण्यात आले होते. मात्र पोलीस बंदोबस्तात हे टॅकर महाराष्ट्र-गुजरात सीमेवर सोडण्यात आले. खेडगावला सापुताराकडे जाणार्‍या आंब्याचे वाहन पकडण्यात आले होते.
संपाचा सर्वाधिक फटका बाजार समित्यांना बसला. जिल्ह्यातील २० टक्के व्यवहार समित्यांंत पहिल्याच दिवशी ठप्प झाल्याचे बोलले जात होते. कांदा, फळे, भाजीपाला विक्रीसाठी येत नसल्याने समित्यांचे व्यवहार बंद पडले होते. मात्र काही शेतकर्‍यांना संपाची तीव्रता माहीत नसल्याने त्यांनी वाहनातून माल आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा जागोजागी असलेल्या संपकर्‍यांनी वाहने परत घेऊन जाण्यास शेतकर्‍यांना भाग पाडले. त्यामुळे बाजार समित्यांकडे वाहने गेली नाहीत.
येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथे टोलनाक्यावर भाजीपाल्याीे वाहने अडवून त्यांच्या काचा फोडणार्‍या जमावाला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी कलम १४४ लावून संचारबंदी केली. तसेच हिंसक जमावाला पांगवण्यासाठी प्लॅस्टिक बुलेट फायरिंग पोलिसांना करावी लागली. पिंपळगाव-खेडगाव रस्त्यावर प्रत्येक वाहन आंदोलकांकडून तपासण्यात येत होते.
शिरवाडे फाट्यावर संपकरी रास्ता रोको आंदोलन करत असल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यात काही आंदोलनकर्ते जखमी झाले. भरवस फाट्यावर दुधाच्या टँकरला अडवून दूध रस्त्यांवर ओतून देण्यात आले. वाकदफाटा येथे दोन फळवाहतूक करणारे दहा चाकी ट्रक अडवून त्यातील माल ओतून देण्यात आला. तर धामोरी फाटा येथे मिनी ट्रकमधील बटाटे रस्त्यावर फेकून देण्यात आले.
शेतकरी संपाचा फटका आठवडे बाजारांना बसला. जिल्ह्यातील बहुतेक गावांचा आज आठवडे बाजार होता. मात्र शेतकरी संपामुळे पाल उभारूनही बाजार भरू शकले नाहीत. नांदगाव येथे आठवडे बाजारात किराणा, मासळी, सुकामेवा, मसाले पदार्थ वगळता भाजीपाल्याच्या दुकानांचा अभाव दिसून आला. दुसर्‍या दिवशी असणार्‍या आठवडे बाजारांना आजच अटकाव करणारे आवाहन गावातील संपकर्‍यांकडून करण्यात येत होते.

 

LEAVE A REPLY

*