आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर

0

सोमवारची बैठक रद्द, प्रस्ताव मंजुरीसाठी पुन्हा बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या 27 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.
जिल्हाधिकर्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्राप्त प्रस्तावांपैकी किती प्रस्तावांना मंजुरी मिळणार? सोमवारी 22 रोजी प्रशासनाने प्रस्ताव मंजुरीसाठी बैठक बोलावली होती.मात्र, सध्या विशेष अधिवेशन सुरू असल्याने ती रद्द करण्यात आली आहे.
आता सदर बैठक कधी होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीमध्ये सर्व आमदार व पंचायत समिती सभापतींचा समावेश आहे. 2017 या वर्षात जिल्ह्यातील तब्बल 53 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.त्यामध्ये 11 पात्र ठरले असून 11 ची फेरतपासणी तर, 31 प्रस्ताव प्रलंबित होते. त्यापैकी 27 प्रस्ताव आगामी बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
संबंधित 27 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची तालुकानिहाय नावे- शरद शिंदे (श्रीगोंेदा), रंजना खरात (संगमनेर), बाबासाहेब म्हसे (ममदापूर), संदीप बावके (राहाता), सागर डेंगळे (कोल्हार), सोपान थेटे (भगवतीपूर), शांताराम हांडे (संगमेनर), कैलास आहेर (झरेकाठी), शिवाजी आमले (पारनेर), ज्ञानेश्‍वर निक्ते (शेवगाव), संदीप वामन, लिलाबाई ढेरंगे (संगमनेर),समिर शेख (जामखेड), ज्ञानदेव लांबे (नेवासा), प्रकाश थोरात (कर्जत), बबन आनंदकर (श्रीगोंदा), बाळासाहेब चितळे, अरुण शिरसाठ (पाथर्डी), प्रदिप कालेकर (राहाता), शहाबाई उगले (जामखेड), बाळू श्रीराम (कर्जत)रमेश गोडगे, दिलीप लांडगे (संगमनेर), साईनाथ दुशिंग (राहुरी), बप्पासाहेब धावणे (शेवगाव), अरुण मुनतोडे आदींच्या नावे प्रस्ताव प्राप्त आहेत.

वर्षनिहाय आत्महत्या
सन 2014 मध्ये 49 आत्महत्या ग्रस्तशेतकर्‍यांचे प्रस्ताव प्राप्त होते.त्यामध्ये 21 पात्र व 28 अपात्र ठरले, 2015 मध्ये 116 पैकी 68 पात्र व 50 अपात्र, 2016 मध्ये 144 पैकी 92 पात्र व 51 अपात्र आदी.

1 लाख रुपयांची मदत
आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांचे प्रस्ताव मंजुर झाल्यास प्रत्येकी 1 लाख रुपये आर्थिक मदत मिळते. तहसिलदार यांच्याकडून प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी टंचाई शाखेला प्राप्त होतो.त्यानूसार प्रांताधिकारी व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्हास्तरीय समितीपुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जातो.

आवश्यक कागदपत्र
आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांचा प्रस्तावसाठी मयत शेतकर्‍यांच्या नावे जमिन, कर्जबाजारी असल्यास तगादा केल्याची नोटिस, सततची नापिकी असल्याचा अहवाल, पंचनामा याशिवाय इतर कागदपत्र आवश्यक आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या समितीमध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक, झेडपी सीईओ, जिल्हा कृषी अधिक्षक आदींचाही समावेश आहे. 

LEAVE A REPLY

*