लोणीतून राज्यव्यापी आंदोलनास प्रारंभ

0

3500 रुपये पहिली उचल अन कारखान्याच्या नफ्यात वाटा द्या : डॉ. अजित नवले

लोणी (वार्ताहर) – राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला असतानाही उसाच्या भावाचा तिढा मात्र, कायम आहे. राज्यातील शेतकर्‍यांच्या 12 संघटनांनी एकत्र येत हा तिढा सोडवण्यासाठी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर काल गुरुवार दि. 7 डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. फक्त पाणी पिऊन हे आंदोलक उपोषणाला बसले आहेत.

अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसचिव डॉ. अजित नवले यांच्यासह 12 संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. आईवडिलांच्या घामाचे दाम मागण्यासाठी शेतकर्‍यांची मुले लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत. राज्यात सर्वत्र उसाला पहिली उचल 3 हजार 500 रुपये प्रति टन मिळावी आणि साखर कारखान्यांच्या नफ्यात शेतकर्‍यांना वाटा मिळावा अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही हे उपोषण करीत असून आम्ही शांततेच्या मार्गाने हे करीत असताना आमच्यावर गोळ्या झाडल्या, आमच्यावर लाठीहल्ला केला अथवा आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही घाबरणार नाही. त्याचा सामाना करू व शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ, असे डॉ. नवले यांनी म्हटले आहे.

शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय मराठा महासंघ, प्रहार, भूमिपूत्र शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, क्रांतिसेना, आम आदमी शेतकरी संघटना, बळीराजा पार्टी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, युक्रांद आदी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.अगोदर हे आंदोलन फक्त नगर जिल्ह्यासाठीच आहे, अशी चर्चा होती. मात्र, आयोजकांनी सुरुवातीलाच हे राज्यव्यापी आंदोलन असल्याचे स्पष्ट केल्याने त्याचे महत्व वाढले.

कर्जमाफी आणि शेतमालाच्या भावासाठी पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी संपावर जाऊन केलेले आंदोलन देशभर गाजल्याने आता लोणीचे आंदोलनही त्याच मार्गाने जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोणी गावात ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा सुरू असल्याने ग्रामपंचायतीने पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर जागा उपलब्ध नसल्याचे प्रशासनाला कळवले होते.

त्यानुसार 4 तारखेला होणारे आंदोलन आयोजकांनी पुढे ढकलून ते 7 तारखेपासून करणार असल्याचे जाहीर केले.परंतु ग्रामपंचायतीने पूर्वीच या पुतळ्याजवळ अथवा समोर आंदोलन, उपोषण करण्यास मनाई करणारा ठराव ग्रामसभेत मंजूर केलेला असल्याने प्रशासनाने त्याच्या आधारे आंदोलनास परवानगी नाकारली होती.

परवानगी मिळाली नसताना शेतकरी संघटनांनी राज्यघटनेतील कलम 19 चा हवाला देत आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचे सांगितले. तसेच सकाळी लोणी येथील बसस्थानक परिसरात कार्यकर्ते जमा होऊ लागले. सर्व प्रथम डॉ. अजित नवले, बाळासाहेब पटारे हे कार्यकर्त्यांसह लोणीत दहा वाजता दाखल झाले.

त्यानंतर नगर, सोलापूर, बीड, जालना, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यमधून कार्यकर्ते लोणीत दाखल झाले. दुपारी बारा वाजेपर्यंत शेकडो कार्यकर्ते दाखल झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
साध्या वेशात पोलीस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तरुणांसह महिला देख्ील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. दरम्यान कार्यकर्ते बस स्थानक परिसरात जमा झाल्यानंतर तेथे आंदोलनाची माहिती देऊन व्यूहरचना आखण्यात आली.

डॉ. अजित नवले, डॉ. संदीप कडलग, अ‍ॅड. बन्सी सातपुते, अजित बारस्कर, बाळासाहेब पटारे, लालू दळवी, संतोष वाडेकर, राजेंद्र बावके, अशोक सब्बन, दशरथ गव्हाणे, जनार्धन घोगरे, आर. डी. चौधरी, खंडू वाकचौरे, रोहिदास धुमाळ, सुभाष येवले, डॉ. जालिंदर घिगे, जीवन सुरुडे, राजेंद्र गोर्डे, अशोक पटारे, विठ्ठलराव शेळके, चांगदेव विखे आदी उपस्थित होते.

दुपारी 1 वाजता सर्व आंदोलनकर्ते पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्याकडे घोषणा देत निघाले. मात्र पुतळ्याच्या समोर यात्रेची दुकाने लागलेली असल्याने आंदोलकांना तेथे जागा उपलब्ध नव्हती. शेवटी डॉ. अजित नवले यांनी पुतळ्यासमोर संगमनेर रस्त्यावरच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व जण रस्त्यावर उपोषणाला बसले.
डॉ. नवले म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवून पद्मश्री विखे पाटील यांनी शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचा मोबदला मिळवून दिला. मात्र आज तो सहकार राहिला नाही.

शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही मिळत नाही. यासाठी आम्ही पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करून शेतकर्‍यांच्या घामाचे दाम मागत आहोत. आम्हाला जागा दिली नाही, आमचा मंडपवाला प्रशासनाने पळवून लावल्याचा आरोप त्यांनी केला.

तरीही आम्ही मागे हटणार नाही. अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न होईल याची आम्हाला जाण आहे.आमचा लढा कोणत्याही व्यक्ती अथवा कारखान्याविरोधात नाही तर सरकार आणि त्यांची धोरणे यांच्या विरोधात आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधीपक्षनेते असल्याने त्यांनी सरकारविरोधी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील सर्व साखर कारखान्यांना उसाला पहिली उचल 3 हजार 500 रुपये द्यावी, दरवर्षी आंदोलन करण्याची गरज भासू नये म्हणून सरकारने आपला अधिकार वापरून उत्पादन खर्चावर आधारित सामान उचल द्यावी व ती देणे कारखान्यांना बंधनकारक करावे.

साखरेच्या भावावरून उसाचा भाव ठरवण्याची पद्धत बदलावी. दरवर्षी उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के या निकषानुसार पहिली उचल ठरवावी. साखर उद्योगातील नफ्यात शेतकर्‍यांना वाटा द्यावा. कारखान्यांना इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवणे सक्तीचे करून ते साखर आयुक्त कार्यालयाला जोडण्यात यावेत. साखरेवरील सरकारी नियंत्रण हटवून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे.

शेवगाव येथील गोळीबारातील जखमींना दहा लाखांची मदत द्यावी. शेतकार्‍यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. ऊस व्यवसायात 70:30 सूत्रांची काटेकोर अंमलबजावणी करावी, साखर उतारा व चोरी रोखण्यासाठी कडक पाऊले उचलावीत. कार्यकारी संचालकांची पदे लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेतून भरावीत अशा अनेक मागण्यासाठी हे उपोषण असून मागण्या मान्य होई पर्यंत कोणत्याही परिस्थितीत उपोषण थांबणार नाही असे डॉ. नवले यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी अ‍ॅड.बन्सी सातपुते, डॉ. संदीप कडलग, सुभाष निकम, सिध्दप्पा कलशेट्टी, माणिक अवघडे, विलास बाबर, गोविंद अर्धड यांची भाषणे झाली. उपोषणास पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून विविध संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते येत आहेत.

लोणी संगमनेर रस्त्यावरच मंडप टाकून उपोषण सुरू झाल्याने पोलिसांनी संगमनेरकडे जाणारी वाहतूक गावाबाहेरून वळवल्याने रहदारीचा प्रश्न सुटला आहे. आता या उपोषणाची सरकार आणि प्रशासन कशा प्रकारे दाखल घेते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

ऊस उत्पादकांसाठी लोणी येथे उपोषणास बसणारे उपोषणार्थी – 

डॉ. अजित नवले, बाळासाहेब पटारे, अजय महाराज बारस्कर, डॉ. संदीप कडलग, बन्सी सातपुते, संतोष वाडेकर, रूपेंद्र काले, नीलेश तळेकर, सुभाष येवले, बच्चू मोढवे, अशोक पटारे, जनार्दन घोगरे, राजेंद्र बावके, चांगदेव विखे, जालिंदर चोभे, विलास कदम, युवराज जगताप, अनिल औताडे, साईनाथ घोरपडे, शिवराम शेटे, गोरक्ष साळुंके, दिगंबर भोसले, प्रकाश मालुंजकर.                       

उद्धव मापारी उपोषणात सहभागी!
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात उसाच्या आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले शेतकरी उद्धव मापारी यांनी लोणीत येऊन आमरण उपोषणात सहभाग नोंदवला आहे. यावेळी त्यांनी अंगावरील कपडे काढून बंदुकीतील गोळ्यांनी शरीरावर झालेल्या जखमा उपस्थितांना दाखवल्या.

                  या शेतकर्‍याला ना. राधाकृष्ण विखे पाटील रुग्णालयात जाऊन भेटले होते. त्यावेळी त्यांनी सरकार शेतकरी विरोधी असून ते गोळ्या घालून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका केली होती. आता तुमच्या गावात आम्ही सरकार विरोधात उपोषण करीत असताना आम्हाला जागा सुद्धा कशी मिळत नाही, असा सवाल डॉ. नवले यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

*