कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात

0

शेतकर्‍यांना सुविधा उपलब्ध करून देणारी तालुक्यातील खोकर सोसायटी पहिली, अर्जात तफावत

भोकर (वार्ताहर) – शासनाने कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. मात्र स्पॉप्टवेअरमध्ये अनेक अडचणी होत्या. त्यावर मात करत कालपासून हे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून श्रीरामपूर तालुक्यातील खोकर सोसायटीने आपले सभासद असलेले थकबाकीदार कर्जदारांना आता सोसायटी कार्यालयातच ऑनलाईन अर्ज सुविधा दिल्याने शेतकर्‍यांत समाधान व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणारी पहिलीच सोसायटी आहे.

राज्य सरकारने थकबाकीदार कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले पण या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेत अडचणी येत असल्याने अनेकांचा बराच वेळ खर्च होऊन आर्थिक फटका बसला. त्याचबरोबर सेतूमध्ये होत असलेला मानसिक त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. पण सॉप्टवेअरमध्ये अनेक अडचणी व त्यावर असलेला मार्ग यात सुसूत्रता नसल्याने शुक्रवारी अनेक शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली.

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर सोसायटीचे मार्गदर्शक अशोक कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव यांनी संचालक मंडळ व कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेत थेट गावातच नव्हे तर सोसायटी कार्यालयात अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काल प्रत्यक्षात सुरूवात झाली. श्रीरामपूर तालुक्यातील हा पहिला प्रयोग असल्याचे दिसत आहे. या सोसायटीने यापूर्वीही तालुक्यात पहिल्यांदा शेतकर्‍यांना उचल कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

सोसायटी माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या ताब्यात असून येथील सूत्र पोपटराव जाधव यांच्या ताब्यात आहेत. या संस्थेत 340 कर्जदार आहेत. त्यात दीड लाखाच्या आतील कर्जदार 123, दीड लाखावरील कर्जदार 12, प्रोत्साहन अनुदानास पात्र 20 तर पुर्नगठन केलेले 185 कर्जदार आहेत. त्यातील अनेकजण वृद्ध माता-पित्यांना घेऊन व काहीजण सहकुटूंब शहरातील काही सेतूवर गेले. मात्र तेथे अगोदर आधार लिंकींग नंतर मोबाईल रजिष्टर करणे व त्यानंतर अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया, असे काम सुरू होते. पण सर्व्हर साथ देत नव्हते. त्यात काहींचे अर्ज सेव्ह झाले दुसर्‍याच जिल्ह्यात झाल्याने कुणालाच काही सूचत नव्हते. अशा परिस्थितीत या सोसायटीने काही महिन्यापूर्वी बांधलेल्या सुसज्ज इमारतीतच ही सुविधा कालपासून उपलब्ध करून दिली.

शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नावाने सुरू केलेल्या या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास काल सोसायटीत सुरूवात झाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व वृद्धांनी गर्दी केली होती. यासाठी या सोसायटीने शहरातील सेतूचालकांना खोकर येथेच बोलावून त्यांना इंटरनेट, कॉम्प्युटर आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि कामास एका महिला कर्जदाराच्या अर्जापासून सुरुवात केली.

या अर्जात कर्जदाराचे नाव, आधार नंबर, पत्ता, लींग, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर, खाते नंबर, बँकेचे किंवा संस्थेचे नाव, बचत खाते नंबर आदी तपशिल भरावा लागतो. त्यानंतर कर्जमाफीचे चार प्रकार आहेत. त्यात पहिल्या क्रमांकाच्या कॉलममध्ये दीड लाखाच्या आतील मुद्दल व व्याजासह रकमेस पात्र, दुसर्‍या कॉलममध्ये दीड लाखापेक्षा जास्त मुद्दल व व्याजासह रकमेपैकी असणारी माझ्या हिश्याची रक्कम भरण्याच्या अटीस अधीन राहून दीड लाख रकमेची माफी मिळण्यास पात्र.

तिसर्‍या कॉलममध्ये सन 2015-16 व सन 2016-17 या मधील पिक कर्जाची मुदतीत फेड केले पोटी प्रोत्साहन लाभास पात्र तर चौथ्या क्रमांकास सन 2015-2016 पर्यंतच्या पुर्नगठीत केलेल्या पिक कर्जासाठी लाभ मिळण्यास पात्र असे कॉलम आहेत. त्यात संबंधित कर्जदार कुठल्या योजनेस पात्र त्याप्रमाणे निवड करायची असल्याने येथे जाणकारच असावे लागतात, असे अनेक जाणकारांनी सांगितले.

या कर्जमाफी अर्ज भरणा सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी अशोकचे संचालक पोपटराव जाधव, सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब पटारे, उपाध्यक्ष मथुराबाई चक्रनारायण, प्रभाकर पेरणे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राम पटारे, रमेश पटारे, रेवन्नाथ भणगे, काशिनाथ गव्हाणे, प्रकाश पटारे, बाळासाहेब चक्रनारायण, लक्ष्मण सलालकर, सुकदेव सिन्नरकर, कैलास भणगे, दादा पाटील पटारे, बाबासाहेब कोल्हे, दत्तात्रय चव्हाण, सुरेश काळे, गोरक्षनाथ जाधव, बाळासाहेब जाधव, बाळ जोशी, यशवंत पाटील, दिलावर पठाण, केशवराव चव्हाण आदींसह कर्जदार शेतकरी व महिला उपस्थित होत्या. याकामी श्रीरामपूर शहरातील सेतुचालक राहुल म्हस्के, श्रीकांत शेळके हे परिश्रम घेत असून त्यांना संस्थेचे सचिव कृष्णा शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, मन्सूर पठाण हे सहकार्य करत आहेत.
या कर्जमाफी अर्जात व सॉफ्टवेअरमध्ये फरक असल्याने चुकीच्या ठिकाणी क्लीक झाल्यास एकतर मोठा फायदा होणार असल्याचे दिसत आहे. कारण बँकेने उपलब्ध करून दिलेल्या अर्ज नमुण्यात तीन क्रमांकाच्या कॉलममध्ये सन 2015-2016 व सन 2016-2017 मधील पिक कर्ज मुदतीत परतफेड केल्यापोटी अनुज्ञेय प्रोत्साहन लाभास पात्र तर चौथ्या क्रमांकाच्या कॉलममध्ये सन 2015-16 पर्यंतच्या पुर्नगठन केलेल्या पिक कर्जासाठी अनुज्ञेय लाभ मिळण्यास पात्र, असे लिहिलेले आहे. तर ऑनलाईन अर्जात मात्र याउलट तिसर्‍या क्रमांकाच्या कॉलममध्ये सन 2015 – 16 पर्यंतच्या पुर्नगठीत केलेल्या पिक कर्जासाठी अनुज्ञेय लाभ मिळण्यास पात्र व चौथ्या क्रमांकाच्या कॉलममध्ये सन 2015-16 आणि सन 2016-17 मधील पिक कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केल्यापोटी अनुज्ञेय प्रोत्साहन लाभास पात्र, अशा प्रकारे रचना असल्याचे येथील सचिव कृष्णा शिंदे यांनी संंंबंधित सेतूचालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधिताने लगेच मुंबई येथील डाटा सेंटरच्या हा प्रकार लक्षात आणून दिला असता त्यांनी वरिष्ठांना कळवू, असे शिंदे यांनी सांगितले. मात्र आता जर संबंधित अर्जदाराकडून बँकेचा अर्ज बघून संगणकावर क्लीक केले तर त्या शेतकर्‍यास चुकीचा लाभ होणार काय? असा प्रश्‍न उद्भवत असल्याने आता काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*